पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 12:15 IST2025-10-05T12:14:35+5:302025-10-05T12:15:54+5:30
लोहगावच्या वाघोली रोडवर एका माजी सैनिकाच्या सत्काराचा कार्यक्रम लॉन्सवर ठेवण्यात आला होता. त्यासाठी आमदार बापू पठारे तिथे येणार होते

पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
पुणे - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर राजकारण तापलं आहे. पुण्यातील वडगाव शेरी येथील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांसोबत झालेल्या या वादातून ही मारहाण झाल्याचं समोर आले आहे. या मारहाणीत आमदार पठारे यांना किरकोळ दुखापत झाल्याचं बोललं जात आहे.
शनिवारी संध्याकाळी लोहगाव परिसरात एका कार्यक्रमाचं आयोजन केले होते. या कार्यक्रमावेळी दोन गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद रंगला. आमदार बापू पठारे आणि अजित पवारांचे समर्थक बंडू खांदवे यांच्यातील शाब्दिक वादाचे पडसाद हाणामारीत झाले. वाद चिघळल्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रस्त्याच्या कामावरून हा वाद उफाळून आला. प्रशासनाकडून लोहगाव रस्त्याचे काम काही कारणास्तव थांबवण्यात आले होते. यावरून हा वाद घडल्याचं कळतं.
लोहगावच्या वाघोली रोडवर एका माजी सैनिकाच्या सत्काराचा कार्यक्रम लॉन्सवर ठेवण्यात आला होता. त्यासाठी आमदार बापू पठारे तिथे येणार होते. त्याच कार्यक्रमात लोहगाव ग्रामपंचायतीचे माजी सभापती बंडू खांदवे बाहेर येत असताना आमदार पठारे यांची एन्ट्री झाली. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर दोन्ही बाजूने झटापट सुरू झाली. आमदार पठारे यांना धक्काबुक्की झाल्याचे कळताच त्यांचे समर्थकही तिथे दाखल झाले. खांदवे यांचे समर्थकही तिथे होते. त्यामुळे परिसरात मोठा तणाव वाढला.
काय आहे प्रकरण?
८ डिसेंबर २०२३ रोजी संबंधित रोडसाठी ३१ कोटी मंजूर झाले होते, परंतु रस्त्याचे काम सुरू नव्हते. रस्त्यावर पाण्याच्या लाईन, ड्रेनेजच्या लाईन नव्हत्या मग रस्ता कसा करायचा होता असा सवाल आमदार बापू पठारे यांनी केला. ५ वर्ष सत्तेत असताना तुम्हाला कुणी अडवले होते. आता चुकीची यादी दाखवून लोकांची दिशाभूल केली जाते. माझ्याबरोबर खोटे राजकारण करू नका, जनता माफ करणार नाही असं आमदारांनी म्हटलं तर आमचे आंदोलन प्रशासनाविरोधात होते. आमदारांनी स्वत: हा विषय स्वत:वर ओढावून घेतला. झटापटीत आमदारांच्या सुरक्षा रक्षकांनी माझा शर्ट फाडला, मलाही मारहाण केली असा आरोप बंडू खांदवे यांनी केला आहे.
दरम्यान, पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांना करण्यात आलेल्या मारहाणीच्या घटनेचा तीव्र निषेध करतो. लोकप्रतिनिधीला धक्काबुक्की होत असेल तर तिथं सामान्य माणसाचं काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केली आहे.