राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांची प्रकृती अद्यापही अस्थिर; शरद पवारांची रुबी हॉलला भेट देत विचारपूस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 18:41 IST2020-11-27T18:33:14+5:302020-11-27T18:41:11+5:30
आमदार भारत भालके हे कोरोनामुक्त होऊन सुखरूप स्वगृही परतलेले होते. परंतु इतर आजार बळावल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलवले होते.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांची प्रकृती अद्यापही अस्थिर; शरद पवारांची रुबी हॉलला भेट देत विचारपूस
पुणे : पंढरपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदारभारत भालके यांच्यावर रुबी हॉल रुग्णालय येथे उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याची माहिती हाती आली आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुबी हॉलमध्ये प्रत्यक्ष जात भालके यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदारभारत भालके यांची प्रकृती गंभीर असतानाच त्याच्यासंदर्भात सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. भालके यांची तब्येत गंभीर असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी अधिकृत माहिती डॉक्टरांनी दिली आहे. रूबी हॉल क्लिनिक बाहेर त्यांच्या तब्येतीबद्दलचे पहिले मेडिकल बुलेटीन दुपारी साडेचार वाजता प्रसारित करण्यात आले. मात्र याचवेळी आमदार भालके यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रार्थना केली जात आहे.
आमदार भारत भालके हे कोरोनामुक्त होऊन सुखरूप स्वगृही परतलेले होते. परंतु इतर आजार बळावल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलवले होते. पुणे येथील रूबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील रुग्णालयात जात आमदार भालके यांच्या तब्येती विषयीची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली. त्याचवेळी रूपाली चाकणकर यांच्यासह आदी अनेक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन विचारपूस केली.
दरम्यान साडेचार वाजता प्रचंड गर्दी झाल्याने स्वतः डॉक्टरांनी बाहेर येऊन माहिती दिली. आ. भालके यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, ते व्हेंटिलेटरवर आहेत. पंढरपुरातून दाखल झालेल्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची रुबी हॉलच्या समोर गर्दी पाहायला मिळत आहे. याचवेळी भालके यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रार्थना केली जात आहे.