आमदार सांभाळण्यात आणि त्यांना पाहण्यातच सरकार बिझी- जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 15:20 IST2022-11-04T15:20:17+5:302022-11-04T15:20:40+5:30
पोलीस भरतीच्या स्थगितीविरोधात राष्ट्रवादीतर्फे निषेध आंदोलन....

आमदार सांभाळण्यात आणि त्यांना पाहण्यातच सरकार बिझी- जयंत पाटील
पुणे : राज्य सरकारच्या हातातून अनेक उद्योग बाहेर जात आहेत. परंतु, हे सरकार काहीच करत नाही. आपल्याकडील आमदार दुसरीकडे जाणार नाहीत ना? हे पाहण्यात आणि त्यांना सांभाळण्यातच सरकारचा वेळ जात आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी पुण्यात लगावला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहरतर्फे शास्त्री रस्त्यावर राज्यातील ईडी सरकारने पोलीस भरतीवर आणलेल्या स्थगितीविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी पाटील बोलत होते. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, युवक अध्यक्ष किशोर कांबळे, युवक कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, अजिंक्य पालकर, रूपाली ठोंबरे, वेणू शिंदे आदी उपस्थित होते.
निर्णय घेण्यापेक्षा रद्द करण्यावर भर
राज्य सरकारने पोलीस भरती रद्द केली आहे. त्यामुळे तरुणांचा रोजगार गेला आहे. या संदर्भातील निर्णय राज्य सरकारने तातडीने घेऊन तरुणांना दिलासा देणे आवश्यक आहे. सध्या हे सरकार महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निर्णय रद्द करण्यावरच लक्ष देत आहे. त्यापेक्षा योग्य निर्णय घेण्यावर त्यांनी लक्ष दिले पाहिजे. मोठे प्रकल्प राज्यात आले असते, तर रोजगार निर्माण झाला असता. परंतु, मोठे प्रकल्प गुजरातकडे जात आहेत, असेही जयंत पाटील म्हणाले.