पुणे : नवले पुलावर होणारे अपघात रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी रिंग रोडचा पर्याय वापरता येईल का? याबाबत चाचणी केली असता पीएमआरडीएचा रिंग रोड सोयीचा ठरणार असल्याचे प्राथमिक पाहणीतून समोर आले आहे. मात्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेला बाह्य रिंग रोड तांत्रिकदृष्ट्या अडचणीचा असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता येथील वाहतूक वळविण्यासाठी पीएमआरडीएच्या रिंग रोडचा वापर केला जाणार आहे.
जांभूळवाडी येथून थेट पुणे - मुंबई एक्स्प्रेस वेवरील गहुंजे स्टेडीयम दरम्यानच्या रस्त्याचे काम केल्यास नवले पुलाला पर्याय निघू शकतो. त्यावर येत्या आठवड्यात बैठक घेऊन काम सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
नवले पुलाजवळ दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात आठ जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या विविध विभागांनी यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले.
तर जिल्हा प्रशासनाने रिंग रोडचा पर्याय पुढे आणला आहे. सध्या पीएमआरडीएकडून अंतर्गत रिंग रोड तर राज्य रस्ते विकास महामंडळाकडून बाह्य रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. नवले पुलाच्या परिसरातून महामंडळाचा रिंग रोड जातो. परंतु तो भूमिगत असल्यामुळे ते काम होण्यास विलंब होऊ शकतो. मात्र, पीएमआरडीएचा रिंग रोड हा जांभूळवाडी येथून थेट गहुंजे स्टेडियमजवळ निघतो. सुमारे चाळीस किलोमीटर लांबीचा हा रिंग रोड आहे. त्या रस्त्याचे काम गतीने मार्गी लागू शकते. त्यामुळे या पर्यायावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे.
याबाबत डुडी म्हणाले, ‘‘पीएमआरडीएच्या रिंग रोड हा ८० किलोमीटर लांबीचा आहे. ज्या गावातून जाणार आहे. त्या गावातील सर्व जमिनींची मोजणी पूर्ण झाली आहे तर तीन गावातील भूसंपादनाचे दरदेखील निश्चित झाले आहेत. उर्वरित गावांतील दर निश्चितीचे काम एक महिन्यात पूर्ण होईल. त्यासाठी या आठवड्यात बैठक बोलविण्यात आली आहे. त्यामुळे रिंग रोडचे काम गतीने मार्गी लागू शकते. त्यामुळे या कामाला प्राधान्य देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.’’
Web Summary : To curb Navale Bridge accidents, PMRDA's ring road is considered a viable alternative. A direct route from Jambhulwadi to Gahunj Stadium could bypass the danger zone. The administration prioritizes this faster, 40-km option over the delayed outer ring road.
Web Summary : नवले पूल अपघातांना आळा घालण्यासाठी पीएमआरडीएचा रिंगरोड हा एक व्यवहार्य पर्याय मानला जात आहे. जांभूळवाडी ते गहुंजे स्टेडियम असा थेट मार्ग धोकादायक क्षेत्र टाळू शकतो. प्रशासनाने बाह्य रिंगरोडच्या विलंबापेक्षा या जलद, 40 किमी पर्यायाला प्राधान्य दिले आहे.