नानापेठ गोळीबार प्रकरण : वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला म्हणून आयुष कोमकरची हत्या; भावनिक वातावरणात अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 23:25 IST2025-09-08T23:24:33+5:302025-09-08T23:25:15+5:30
आयुषचे वडील गणेश कोमकर, जो सध्या नागपूर कारागृहात वनराज आंदेकर हत्या प्रकरणी शिक्षा भोगत आहे, तो पॅरोलवर सुटून आपल्या मुलाच्या अखेरच्या प्रवासाला उपस्थित राहिला. कारागृहातून सुटका मिळाल्यानंतर थेट वैकुंठ स्मशानभूमीत पोहोचलेल्या गणेश कोमकरच्या डोळ्यांत दुःख दाटून आले होते.

नानापेठ गोळीबार प्रकरण : वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला म्हणून आयुष कोमकरची हत्या; भावनिक वातावरणात अंत्यसंस्कार
नानापेठेत झालेल्या रक्तरंजित गोळीबारातून वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला म्हणून आयुष उर्फ गोविंदा कोमकर (वय २४) याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. गेल्या तीन दिवसांपासून आयुषचा मृतदेह ससून रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला होता. आज अखेर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी परिसरात तणावपूर्ण आणि भावनिक वातावरण होते.
आयुषचे वडील गणेश कोमकर, जो सध्या नागपूर कारागृहात वनराज आंदेकर हत्या प्रकरणी शिक्षा भोगत आहे, तो पॅरोलवर सुटून आपल्या मुलाच्या अखेरच्या प्रवासाला उपस्थित राहिला. कारागृहातून सुटका मिळाल्यानंतर थेट वैकुंठ स्मशानभूमीत पोहोचलेल्या गणेश कोमकरच्या डोळ्यांत दुःख दाटून आले होते.
मात्र या अंत्यसंस्कारावेळी गणेशच्या हातात असलेले एक भेटकार्ड विशेष चर्चेचा विषय ठरले. हे कार्ड आयुषने तुरुंगात असताना वडिलांना पाठवले होते. त्यावर त्याने आपल्या वडिलांसाठी “आय लव्ह यू पप्पा” असे भावनिक शब्द लिहिले होते. त्याचबरोबर “नवीन ड्रेस पाठवलाय” असेही लिहिले होते. कार्डावर काही बालपणीचे फोटोही चिकटवले होते. या कार्डामुळे उपस्थित वातावरण अधिकच भावनिक झाले.
या घटनेमुळे आंदेकर-कोमकर वादाला पुन्हा एकदा उफाळा आला असून परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी प्रमुख आरोपीसह १३ जणांवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.