नागपूर, हुबळी, कोल्हापूर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसची दिवाळी जोरात; १० दिवसांत पुणे विभागाला २ कोटी महसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 16:24 IST2025-11-05T16:22:18+5:302025-11-05T16:24:45+5:30
दिवाळीत प्रवाशांनी तीनही ‘वंदे भारत’ला चांगला प्रतिसाद दिला असून या गाड्या शंभर टक्के कोटा पूर्ण करून धावल्या आहेत

नागपूर, हुबळी, कोल्हापूर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसची दिवाळी जोरात; १० दिवसांत पुणे विभागाला २ कोटी महसूल
पुणे: दिवाळी काळात पुणे विभागातून धावणाऱ्या पुणे ते नागपूर, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या तीनही वंदे भारत रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद दिला आहे. दि. १७ ते २७ आॅक्टोर या दहा दिवसांच्या काळात या तीनही रेल्वे गाड्यांच्या ३० फेऱ्या झाल्या असून, यातून २३ हजार ८११ नागरिकांनी प्रवास केला आहे. यातून पुणे विभागाला २ कोटी ९४ लाख ४२ हजार इतके उत्पन्न मिळाला आहे. यामुळे या तीनही वंदे भारत रेल्वे गाड्यांची दिवाळी जोरात झाली आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विभागातून जादा रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या होत्या. परंतु दिवाळीत प्रवाशांना जागा मिळणे अवघड होते. त्यामुळे ज्या गाडीचे तिकीट मिळेल, त्या गाडीतून प्रवास करायला नागरिक पसंती दिली. ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचे तिकीट जास्त असले तरी सोयीमुळे प्रवाशांनी याला चांगला प्रतिसाद दिला. पुणे विभागातून कोल्हापूर, हुबळी आणि नागपूर तीन मार्गांवर वंदे भारत धावतात. यामध्ये नागपूरला धावणाऱ्या वंदे भारतला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे या काळात तीनही रेल्वे गाड्या शंभर टक्के कोटा पूर्ण होता. या तीनही गाड्यांमध्ये पुणे ते नागपूर वंदे भारतला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला असून, सरासरी १३० टक्के गाडी भरून धावली आहे. इतर वेळी या रेल्वे गाड्यांना तिकीट दर जास्त असल्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद कमी असतो. मात्र, दिवाळीत प्रवाशांचा या गाड्यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे दिवाळी जोरात झाली आहे.
अशी आहे आकडेवारी
गाडी ----- प्रवासी संख्या ---- उत्पन्न
पुणे - कोल्हापूर --- १९१६--१८८९४३५
कोल्हापूर-पुणे --- २५५०---२१२२३४३
पुणे -अजनी---६६६६---९१७२६६९
अजनी- पुणे ---७७२१---१०८९१२५२
पुणे - हुबळी---२३४१---२५४२४०९
हुबळी--- पुणे ---२६१७---२८६४८२३
एकूण --- २३,८११---२,९४,४२,९३१
दिवाळीत प्रवाशांनी तीनही ‘वंदे भारत’ला चांगला प्रतिसाद दिला आहे. यामुळे या तीनही गाड्या शंभर टक्के कोटा पूर्ण करून धावल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक पुणे ते नागपूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारतला १२५ टक्के प्रतिसाद मिळाला आहे. -हेमंत कुमार बेहेरा, वाणिज्य व्यवस्थापक, पुणे विभाग