पुणे: ‘अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये यासाठी मी बोली भाषेत बोललो होतो. माझ्या बोली भाषेचा विपर्यास केला गेला. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्यांसाठी जे गरजेचे आहे ते आम्ही करू, मी चुकणारा माणूस नाही मी खूप समंजस माणूस आहे,’’ असे स्पष्टीकरण कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
ते पुण्यात सोमवारी (दि. ४) पत्रकारांशी बोलत होते. भरणे यांना कृषीमंत्रीपद मिळाल्यानंतर एका कार्यक्रमामध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. याबाबत खुलासा करताना ते म्हणाले. ते म्हणाले, वाकडं काम ही गावातील बोली भाषा आहे, विनाकारण त्या वाक्याचा विपर्यास केला. कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारी आल्या तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. मी चुकणारा माणूस नाही मी खूप समंजस माणूस आहे, मी असे वक्तव्य करणार नाही.’’
खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता भरणे म्हणाले ‘‘मी जे भाषण केले त्या भाषणाचा पूर्ण सारांश तुम्ही ऐका त्यात मी चुकीचे बोललेलो नाही. संजय राऊत मोठे नेते आहेत, मी त्यांच्यावर बोलणे योग्य नाही.’’ कर्जमाफीबाबत ते म्हणाले, ‘‘उद्या मी पदभार स्वीकारल्यानंतर या संदर्भातला आढावा घेईल. कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील.’’