Pune Crime: मंचर येथे दगडी कडप्पा डोक्यात घालून एकाचा खून; आरोपीचा शोध सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 16:04 IST2021-10-15T16:04:15+5:302021-10-15T16:04:21+5:30
लाकडी काठीने मारहाण करून तसेच दगडी कडप्पा डोक्यात घालून मंचर येथे एकाचा खून करण्यात आला आहे.

Pune Crime: मंचर येथे दगडी कडप्पा डोक्यात घालून एकाचा खून; आरोपीचा शोध सुरु
मंचर : लाकडी काठीने मारहाण करून तसेच दगडी कडप्पा डोक्यात घालून मंचर येथे एकाचा खून करण्यात आला आहे. बाळू राधु पारधी (वय 50 रा. वाळुंजवाडी ठाकरवाडी ता. आंबेगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळुंजवाडी ठाकरवाडी येथे बाळू राजू पारधी हे मुले संदेश, विशाल, सुन स्वाती व नातू प्रसाद यांच्याबरोबर एकत्र राहतात. बाळू पारधी हे आसपासच्या परिसरात मोलमजुरी करत होते. तसेच त्यांना दारू पिण्याचे व्यसन होते. गुरुवारी सायंकाळी बाळू पारधी हे कामाला चाललो आहे. असे सांगून घरातून निघून गेले होते. रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाही. ते मुलगी रीना खंडागळे हिच्याकडे गेले असतील. असे समजून कुटुंबीयांनी शोध घेतला नाही.
गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मंचर शहराच्या हद्दीतील मंचर घोडेगाव रस्त्यालगत असणार्या बिस्मिल्लाह दर्ग्याजवळ संजय जिजाभाऊ पारधी यांना बाळू पारधी हे दारू पिऊन पडलेले दिसले होते. रस्त्याने वाहनातून जात असताना यांनी पारधी यांना पाहिले होते. आज सकाळी कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. सकाळी मंचर घोडेगाव रस्त्यालगत बिस्मिल्ला दर्ग्याजवळ असणाऱ्या कब्रस्तानच्या गेटच्या आतमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.
रात्री अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी लाकडी काठी आणि दगडी कडप्पाने मारहाण करून बाळू राजू पारधी यांचा खून केला आहे. घटनास्थळी दगडी कडप्पा व लाकडी काठी मिळून आली आहे. पारधी यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी ते उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले आहे. संदेश बाळू पारधी यांनी मंचर पोलिसात फिर्याद दिल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मंचर पोलीस खून करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश होडगर करत आहे.