पुणे : महापालिकेची मार्च एण्डिंगची लगीनघाई सुरू झाली असून पडून असलेला निधी खर्च करण्यासाठी वर्षानुवर्षे टेबलावर पडून असलेल्या फायलींना आता वेग आला आहे. वाॅर्डावाॅर्डांत घाईगडबडीत अर्धवट असलेली ड्रेनेजलाइन, पाइपलाइन, रस्त्यांची एकाच वेळी कामे सुरू झाल्याने पुणेकरांना धूळ, वाहतूककोंडी आणि पर्यायी मार्गांचा शोध घेत मनस्ताप सोसावा लागत आहे. मार्च एण्ड जसा जवळ येऊ लागल्याने विविध योजनांचा निधी ३१ मार्चपूर्वी कसा खर्च करता येईल, यासाठी पुणे महानगरपालिकेकडून मार्च एण्डिंगची लगीनघाई पाहायला मिळत आहे.
पुणे महानगरपालिकेला केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजनेअंतर्गत विकासकामासांठी निधी उपलब्ध होत असतो. हा निधी दिलेल्या आर्थिक वर्षात खर्च करणे बंधनकारक आहे, अन्यथा अनेकवेळा उपलब्ध निधी वेळेत खर्च न झाल्याने तो परत पाठवावा लागतो. शासनाचा निधी विकासाच्या विविध बाबींवर खर्च व्हावा, यासाठी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून शहरातील ५ परिमंडळात १५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत विविध विकासकामे सुरू आहेत, पण ठेकेदारांकडून सुरू असलेली ही कामे नियोजनशून्य पद्धतीने सुरू असल्याने पुणेकरांच्या त्रासात भर पडलेली आहे. हे चित्र पुण्याच्या अंतर्गत व मुख्य रस्त्यांपासून गल्लीबोळात दिसून येत आहे.
अनेक कामांना वर्क ऑर्डर मिळूनही ती कामे सहा-सहा महिने लोटली तरी सुरू झालेली नसतात, तर काही बजेट नसल्याची कारण पुढे करत अर्धवट स्थितीत असतात आता सदर कामे एकाच वेळी पूर्ण करून पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वेगाने हालचाली सुरू आहेत. एकीकडे कामे सुरू करून शासनाकडे विविध विभागांमार्फत पैसे लाटण्यासाठी पत्रव्यवहार सुरू असल्याचे दिसून येते. विविध विकासकामांसाठी ठेकेदारदेखील थकीत व चालू बिलांच्या अपेक्षेने सरसावले आहेत. प्रत्येक विभागात ठेकेदार फाइट पुटंअप करण्यासाठी चकरा मारताना दिसत आहेत. म्हणून गेल्या काही दिवसांपासून पुणे महापालिकेत येणाऱ्या ठेकेदार व तत्सम व्यक्तींची संख्या वाढलेली आहे. मात्र, एकाच वेळी मार्च एण्डिंगच्या घाईगडबडीत ड्रेनेज लाइन, पथदिवे, पाइपलाइन व अन्य कामांच्या खोदकामामुळे आणि अर्धवट कामांमुळे पुण्यातील अनेक भागांत वाहतूककोंडी, अपघातांचा धोका आणि दुर्गंधीमुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. अर्धवट खड्ड्यांतून येणारे सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने पुणेकरांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी कंत्राटदारांनी अर्धवट काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने मागील चार ते पाच वर्षांपूर्वी तयार झालेले चांगले सिमेंट रस्ते फोडून ड्रेनेज व पिण्याच्या पाइपलाइनचे काम सुरू केल्याने पुणेकरांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
काय आहे नेमके प्रकरण
पुण्यातील प्रभाग क्रमांक ७ व ८ च्या हद्दीत कस्तुरबा गांधी वसाहत, इंदिरा वसाहत, सुरजबन अपार्टमेंट, शर्मिला अपार्टमेंट, राज रेसीडेंन्सी, जगदीशनगर, रचना गार्डन, आम्रपाली, इंदिरा वसाहत , सिंध अपार्टमेंट या भागातील ६ मीटर अरुंद रस्त्याचे ठेकेदार आकाश कन्स्ट्रक्शनमार्फत दहा दिवसांपासून दिवसरात्र नियोजनशून्य पद्धतीने ड्रेनेजलाइनसाठी खोदकाम सुरू आहे. याभागातील सर्वे क्रमांक ५६-५७ श्रीधर जुनवने पथ ते गणेशखिंड रस्त्याचे तीन वर्षांपूर्वीच काम झाले होते. त्याच्या दोन वर्षांआधी पुणे महानगरपालिकेच्या वतीने येथे ड्रेनेजलाइनचे काम झाले होते, असा आरोप करत कोट्यवधीचा सिमेंट रस्ता फोडायची गरज नव्हती. केवळ बिले काढण्यासाठी कामाचा फुगवटा केला जात असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. यासंदर्भात सचित्र आयुक्तांकडेदेखील तक्रार दाखल केली आहे. परिसरातील चाकरमाने, विद्यार्थी, फेरीवाले, ज्येष्ठ नागरिक सर्वांचेच हाल होताहेत.
या भागात ८० मीटरपर्यंत लाइन ४ वर्षांपूर्वी टाकलेली होती, पण काम अर्धवट होते. आता गणेशखिंड ते सिंद्ध सोसायटीच्या नाल्यातून एकाच स्लोबने पाण्याचा निचरा व्हावा यासाठी ब्रेमन चौकापर्यंत ६०० एमएम व्यासाचे पाइप १५० रनिंग मीटरपर्यंत टाकत आहोत. याभागासाठी ४० ते ६० लाखांची अशी अनेक कामे सुरू आहेत. ठेकेदाराला सुरक्षा साधनांसह तातडीने काम पूर्ण करायचे आदेश दिले आहेत. - पराग सावरकर, कनिष्ठ अभियंता पुणे महानगरपालिका
Web Summary : Pune citizens are facing traffic jams and inconvenience due to rushed, poorly planned infrastructure work by the Pune Corporation to spend funds before the March deadline. Roads are dug up, causing hazards and health concerns. Citizens allege unnecessary road destruction for bill padding.
Web Summary : पुणे निगम द्वारा मार्च की समय सीमा से पहले धन खर्च करने के लिए जल्दबाजी में, खराब योजनाबद्ध बुनियादी ढाँचे के काम के कारण पुणे के नागरिक यातायात जाम और असुविधा का सामना कर रहे हैं। सड़कों को खोद दिया गया है, जिससे खतरे और स्वास्थ्य संबंधी चिंताएँ बढ़ रही हैं। नागरिकों का आरोप है कि बिलों की हेराफेरी के लिए अनावश्यक रूप से सड़कों को नष्ट किया जा रहा है।