साथरोग नियंत्रणासाठी महापालिकेचे प्रभावी पाऊल; सर्वेक्षण केंद्र कार्यान्वित
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 13:37 IST2025-09-28T13:37:20+5:302025-09-28T13:37:32+5:30
पुणे : गेल्या काही वर्षांत पुण्यात विविध साथरोगांचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने महानगरीय सर्वेक्षण केंद्र (मेट्रोपोलिटन सर्व्हिलन्स युनिट) कार्यान्वित ...

साथरोग नियंत्रणासाठी महापालिकेचे प्रभावी पाऊल; सर्वेक्षण केंद्र कार्यान्वित
पुणे : गेल्या काही वर्षांत पुण्यात विविध साथरोगांचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने महानगरीय सर्वेक्षण केंद्र (मेट्रोपोलिटन सर्व्हिलन्स युनिट) कार्यान्वित केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून संसर्गजन्य आजारांवर वेळेत लक्ष ठेवता येणार असून, रोगांचा प्रसार रोखण्यासाठी त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत नियोजन करता येणार आहे.
शहरात यापूर्वी २००९ मध्ये स्वाईन फ्लू, २०२० मध्ये कोरोना आणि नुकतेच २०२५ मध्ये जीबीएससारखे संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात पसरले होते. बदलते पर्यावरण व हवामान, दूषित अन्न व पाणी, तसेच शहरी जीवनशैलीमुळे साथरोग उद्रेकांची शक्यता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जनजागृती, वैज्ञानिक विश्लेषण आणि समन्वयात्मक प्रतिबंधात्मक यंत्रणा उभारण्याच्या उद्देशाने सर्वेक्षण केंद्र सुरू करण्यात आले.
या केंद्रासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांची समन्वय बैठक घेण्यात आली. यात विमानतळ प्राधिकरण, भारतीय हवामान विभाग, सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, रेल्वे, राज्य अन्न व औषध प्रशासन, एनआयव्ही, डब्ल्यूएचओ राज्य किटकजन्य आजार नियंत्रण विभाग, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वैद्यकीय महाविद्यालये, तसेच मनपाच्या पाणीपुरवठा, मलनिस्सारण, आरोग्य आदी विभागांतील प्रतिनिधी उपस्थित होते.
या केंद्राच्या कार्यपद्धतीबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सी.एम.जे. प्रदीप चंद्रन यांनी सांगितले की, विविध विभागांकडून मिळणारी माहिती एकत्रित करून रोगांचे वैज्ञानिक विश्लेषण केले जाईल. त्यामुळे संभाव्य साथरोगांचा अंदाज बांधणे, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना आखणे आणि नागरिकांना सुरक्षित ठेवणे अधिक सुलभ होईल. केंद्रीय अधिकारी डॉ. शुभांगी कळसुंगे (एनसीडीसी) यांनी अल्पावधीत कार्यान्वित एमएसयूबद्दल पुण्याचे अभिनंदन केले. तर जागतिक बँकेचे तांत्रिक सल्लागार डॉ. प्रदीप आवटे यांनी वन हेल्थ संकल्पनेअंतर्गत आंतरविभागीय समन्वयाची गरज अधोरेखित केली. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे यांनी एमएसयूमुळे आरोग्य सेवांना वैज्ञानिक व तांत्रिक बळकटी मिळणार असल्याचे नमूद केले. आयुक्तांनी योगदान दिलेल्या सर्व विभागांचे कौतुक करताना एमएसयू युनिट देशातील सर्वोत्तम व अत्याधुनिक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
महानगरीय सर्वेक्षण केंद्र शहराच्या आरोग्य व्यवस्थेसाठी ऐतिहासिक पाऊल आहे. वेळेवर माहिती संकलन, रोगांचे विश्लेषण आणि त्यावर आधारित उपाययोजना त्वरित करता येतील. नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी ही प्रभावी यंत्रणा ठरेल. - नवल किशोर राम, आयुक्त महापालिका.