एका मांजरीच्या नसबंदीवर महापालिका करते १ हजार ९०० रुपये खर्च; ३ वर्षांत ९९.६६ लाख खर्च!
By राजू हिंगे | Updated: January 14, 2025 17:48 IST2025-01-14T17:47:15+5:302025-01-14T17:48:00+5:30
मांजरीची नसबंदी शस्त्रक्रिया आणि लसीकरण करणारी पुणे ही राज्यातील पहिली महापालिका आहे

एका मांजरीच्या नसबंदीवर महापालिका करते १ हजार ९०० रुपये खर्च; ३ वर्षांत ९९.६६ लाख खर्च!
पुणे: शहरातील भटक्या मांजरींची नसबंदी करून त्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न महापालिका करत आहे. युनिव्हर्सल ॲनिमल वेलफेअर सोसायटी या संस्थेने गेल्या तीन वर्षांत ६ हजार ५४२ मांजरींची नसबंदी करण्यात आली आहे. त्यावर गेल्या तीन वर्षांत ९९ लाख ६६ हजार ५०० रुपये खर्च केले आहेत. एका मांजरीवर नसबंदी करण्यासाठी महापालिका १ हजार ९०० रुपये खर्च करत आहे.
शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेकडून भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण केले जाते. त्यानंतर पुन्हा ती कुत्री पकडलेल्या ठिकाणी सोडली जातात. याच धर्तीवर आता शहरातील भटक्या मांजरींना पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण केले जात आहे. पुणे महापालिका २०२२ पासून शहरातील भटक्या व मोकाट मांजरींना पकडून त्यांची नसबंदी करत आहे. त्यासाठी महापालिका निविदा प्रक्रिया राबवत असते. त्यानुसार युनिव्हर्सल ॲनिमल वेलफेअर सोसायटी या सोसायटीला हे काम मिळाले आहे. मांजरींची स्वतःच्या वाहनातून नेऊन त्यांच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया करणे, त्यांना अँटीरेबीज लस देणे आणि टॅग लावून पकडलेल्या ठिकाणी सोडण्याचे काम संबंधित संस्थेला करावे लागत आहे.
पुणे महापालिकेने २०२२ मध्ये मांजरीची नसबंदी करण्यास सुरुवात केली आहे. मांजरीची नसबंदी शस्त्रक्रिया आणि लसीकरण करणारी पुणे ही राज्यातील पहिली महापालिका आहे. महापालिका संस्थेच्या माध्यमातून काम करते. नसबंदीमुळे मांजरींची संख्या आटोक्यात येण्यास मदत झाली आहे. - डॉ. सारिका फुंडे, पशुवैद्यकीय अधिकारी, पुणे महापालिका
वर्ष नसबंदी केलेल्या मांजरींची संख्या
२०२२-२३ १८०७
२०२३-२४ २८६३
२०२४-२५ १८७२