" मुंबई-हैद्राबाद बुलेट ट्रेन प्रकल्प देश हिताचाच,त्याला आमचा विरोध नाही, पण..."; राज्यमंत्र्यांचं सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 20:16 IST2021-07-27T20:04:47+5:302021-07-27T20:16:02+5:30
मुंबई - हैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेनबाबत सध्या वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत.

" मुंबई-हैद्राबाद बुलेट ट्रेन प्रकल्प देश हिताचाच,त्याला आमचा विरोध नाही, पण..."; राज्यमंत्र्यांचं सूचक वक्तव्य
इंदापूर: मुंबई - हैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेन हा केंद्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहे. मात्र, काही शेतकऱ्यांकडून बुलेट ट्रेनला विरोध दर्शविला आहे.मात्र, आता मुंबई- हैद्राबाद बुलेट ट्रेन प्रकल्प होणे देशाच्या हिताचं आहे. या प्रकल्पास आमचा विरोध नाही. परंतु, हा प्रकल्प अन्य मार्गाहून करणं शक्य असल्याने पर्यायी मार्गाचा वापर करून तो पूर्ण करण्यात यावा अशी आमची मागणी केंद्र सरकारकडं करणार असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
मुंबई - हैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेनबाबत सध्या वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रस्तावित जागेबाबत ड्रोन सर्व्हे देखील झाला आहे. ही ट्रेन इंदापूर तालुक्यातील बागायती पट्ट्यातून जाणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेती उद्ध्वस्त होणार असल्याने शेतकऱ्यांचा याला विरोध होत आहे. त्यामुळे ही ट्रेन पर्यायी मार्गाने जावी अशी आपण केंद्राकडे मागणी करणार असल्याचे भरणे यांनी यावेळी सांगितले आहे.
सध्या इंदापूर तालुक्यातील सणसर, भवानीनगर परिसरातून बुलेट ट्रेनच्या सर्व्हेचे काम सुरू आहे. यामध्ये तालुक्यातील बागायती जमीन हस्तांतर होणार असून शेकडो नागरिकांची राहती घरे मोडली जाणार आहेत. तसेच तालुक्यातील निरा डावा कालव्याला याचा धोका होणार आहे. साहजिकच या तालुक्यातील शेती अडचणीत येणार असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांकडून या प्रकल्पास विरोध होत आहे. त्यामुळे आपण माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून हा प्रकल्प अन्य पर्यायी मार्गाने पूर्ण करण्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे मंत्री भरणे यांनी सांगितले.
केंद्राकडून सदर बुलेट ट्रेनबाबत वेगाने हालचाली होवून सर्व्हे करणारी टीम इंदापूर तालुक्यातील विविध भागात येवून गेली आहे. त्या टीमला शेतकऱ्यांनी थेट जाग्यावर चर्चा केली होती. त्याचवेळी शेकडो शेतकऱ्यांनी तत्काळ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी चर्चा करण्यास धाव घेतली होती. भरणे यांच्या निवासस्थानी जावून शेतकऱ्यांनी विविध अडचणी सांगून चर्चा केली होती.