Multipurpose parking of Jungli Maharaj road | पुणे महापालिकेचा जंगली महाराज रस्त्यावरील बहुमजली वाहनतळ बंदच

पुणे महापालिकेचा जंगली महाराज रस्त्यावरील बहुमजली वाहनतळ बंदच

ठळक मुद्देहा तीन मजली वाहनतळ पालिकेने १५ वर्षांपुर्वी बांधला. त्याची क्षमता ८० वाहनांची सुरू झाल्यापासून पुढील काही वर्षे हा वाहनतळ व्यवस्थित होता सुरू उद्यान विभागाकडे या वाहनतळाची जबाबदारी

राजू इनामदार - 
पुणे: जंगली महाराज रस्त्यावर छत्रपती संभाजी महाराज उद्यानाशेजारी असलेला पालिकेचा चार चाकी वाहनांसाठीचा बहुमजली यांत्रिक वाहनतळ गेल्या अनेक महिन्यांपासून बंदच आहे. निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले जात असले तरी त्यातील यांत्रिक रचना नादुरूस्त झाली असल्याचे समजते. या रस्त्यावर चार चाकी वाहनांसाठी असा वाहनतळ असणे गरजेचे असूनही पालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
हा तीन मजली वाहनतळ पालिकेने १५ वर्षांपुर्वी बांधला. त्याची क्षमता ८० वाहनांची आहे. लिफ्टद्वारे थेट तिसऱ्या मजल्यापर्यंत वाहन लावता येते. त्याची सगळी रचना यांत्रिक असून यंत्रसामग्री परदेशी बनावटीची आहे. पालिकेकडे ती चालवण्यासाठीचे प्रशिक्षित कर्मचारी नाहीत. त्यामुळे सुरूवातीपासूनच निविदा जाहीर करून यंत्रसामग्रीच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी दिली जाते.
सुरू झाल्यापासून पुढील काही वर्षे हा वाहनतळ व्यवस्थित सुरू होता. त्यानंतर मात्र त्याचे बंद असण्याचे प्रमाण वाढतच गेले आहे.काही महिन्यांपुर्वी वाहनतळ चालवायला देण्यासाठी निविदा जाहीर केली गेली, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर दोन वेळा निविदा जाहीर केली, मात्र कोणीही आले नाही.
त्यामुळे वाहनतळ बंदच आहे. अशा सार्वजनिक वाहनतळांची जबाबदारी पालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे असते. तिथे चौकशी केली असता फक्त नाट्यगृहांच्या वाहनतळांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे असे सांगण्यात आले, तसेच उद्यान विभागाकडे या वाहनतळाची जबाबदारी असल्याची माहिती देण्यात आली. उद्यान विभागात विचारणा केली असता त्यांनी स्पष्टपणे वाहनतळ व आमचा काही संबधच नसल्याचे सांगितले. अखेर पालिकेच्या वाहतूक प्रकल्प या विभागाकडे हा वाहनतळ असल्याचे समजले.
या विभागाचे प्रमुख अभियंता श्रीनिवास बोनाला म्हणाले, अन्य वाहनतळ व यांत्रिक वाहनतळ यात फरक असतो. निविदाधारकानेच यंत्रांची देखभाल तसेच अन्य खर्च करायचा असतो. त्याला वाहनतळाचे दर सर्वसाधारण सभेने निश्चित केले त्याप्रमाणेच ठेवावे लागतात. जंगली महाराज रस्त्यावर अशा प्रकारचे बहुमजली वाहनतळ बांधून ते एकाच ठेकेदार कंपनीला चालवायचे असे वाहनतळ धोरणात नमुद केले आहे. त्यामुळे या प्रक्रियेला वेळ लागतो आहे.

Web Title: Multipurpose parking of Jungli Maharaj road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.