मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण; ५ वर्षांत केवळ १० किलोमीटरची ट्रंकलाइन, ४० किमीची कधी होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 10:02 IST2025-07-09T10:02:02+5:302025-07-09T10:02:13+5:30
५ वर्षांत केवळ १० किलोमीटरची ट्रंकलाइन टाकण्यात आल्याने हा प्रकल्प पूर्ण होत असतानाच ट्रंकलाइनच जोडल्या नसतील तर प्रकल्प सुरू होणार कसा? असा सवाल उपस्थित होतोय

मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण; ५ वर्षांत केवळ १० किलोमीटरची ट्रंकलाइन, ४० किमीची कधी होणार?
पुणे : मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण (जायका) अंतर्गत शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ११ नवीन मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या प्रकल्पांचे काम ८० टक्के पूर्ण झालेले असतानाच या प्रकल्पात सांडपाणी वाहून नेण्यासाठी ४९ किलोमीटरची ट्रंकलाइन टाकण्यात येणार होती. मात्र, मागील पाच वर्षांत केवळ १० किलोमीटरची ट्रंकलाइन टाकण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होत असतानाच ट्रंकलाइनच जोडल्या नसतील तर प्रकल्प सुरू होणार कसा? असा सवाल उपस्थित होत आहे.
राष्ट्रीय नदीसंवर्धन योजनेअंतर्गत आणि जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीच्या (जायका) सहकार्यातून हा प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत वडगाव, वारजे, मुंढवा, हडपसर, खराडी, भैरोबानाला, नायडू रुग्णालय, धानोरी, बाणेर आणि नरवीर तानाजीवाडी या ११ ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहेत. जपानच्या जायका या कंपनीने केंद्र शासनाला नाममात्र दराने सुमारे ८५० कोटी रुपये कर्ज उपलब्ध करून दिले आहेत. ही रक्कम पालिकेला अनुदान स्वरूपात मिळत आहे. या प्रकल्पासाठी येणाऱ्या एकूण खर्चापैकी १५ टक्के भार महापालिकेला उचलावा लागत आहे. या प्रकल्पाअंतर्गत (जायका) १ हजार ४७२ कोटी रुपये खर्च करू ३९६ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. हे काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे. पण, भूसंपादनातील अडथळ्यांमुळे अनेक ठिकाणी कामे सुरू करता आलेले नाहीत. अखेर जागा ताब्यात आल्यानंतर ११ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांपैकी १० ठिकाणी काम सुरू केले आहे. त्यांचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत दिली आहे. या आराखड्यानुसार नदीत येणारे नाले, ओढ्यांमध्ये जाणारे सांडपाणी १०० टक्के संकलित करून ते नंतर नदीकाठच्या बाजूने मोठ्या आकाराच्या सांडपाणी वाहिन्याद्वारे (ट्रंकलाइन) प्रकल्पांपर्यंत नेले जाणार आहे. त्यासाठी एकूण ४९ किलोमीटर मोठ्या आकाराच्या ट्रंकलाइनचे जाळे नदीकाठच्या भागात विकसित केले जाणार आहे. मात्र, प्रकल्पाचे काम सुरू झाल्यापासून केवळ १० किलोमीटरचे ट्रंकलाइन काम पूर्ण झाले असून, अद्याप ४० किलोमीटरचे ट्रंकलाइनचे काम बाकी आहे. हे काम होण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे.
कारणे सांगू नका काम पूर्ण करा; आयुक्तांनी खडसावले
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या प्रकल्पाबाबत आढावा बैठक घेतली. तेव्हा मुळा-मुठा शुद्धीकरण प्रकल्पासाठी केवळ १० किलोमीटरची ट्रंकलाइन पूर्ण झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यावर संबंधित ठेकेदाराने नदीपात्रात हार्ड राॅक करून तो ब्लास्टिंग करूनच फोडणे शक्य असल्याचे सांगितले. या प्रकल्पासाठी निधी दिलेल्या जायका कंपनीकडून या कामात कुठेही ब्लास्टिंग न करण्याची अट टाकली आहे. त्यावर कारणे सांगू नका काम पूर्ण करा असे आयुक्त नवल किशाेर राम यांनी सुनावले.