सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चिखल आंदोलन; विद्यार्थ्यांची वसतीगृहासाठी संतप्त मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 12:25 IST2025-07-15T12:24:33+5:302025-07-15T12:25:41+5:30

विद्यार्थ्यांनी चिखलात बसत, हातात फलक घेत प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आवाज उठवला. विद्यापीठ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांना होस्टेलसाठी दररोज भटकंती करावी लागत आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.

Mud protest at Pune University; Students' angry demand for hostel | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चिखल आंदोलन; विद्यार्थ्यांची वसतीगृहासाठी संतप्त मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चिखल आंदोलन; विद्यार्थ्यांची वसतीगृहासाठी संतप्त मागणी

पुणे सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठात शिक्षण घेता यावे, असे स्वप्न राज्यभरातील आणि देश-विदेशातील विद्यार्थीदेखील पाहत असतात. त्यादृष्टीने परीक्षेची तयारी करून प्रवेश घेतात. घरची आर्थिक स्थिती दयनीय असली तरी राहायला वसतिगृह मिळेल आणि कमवा-शिका याेजनेतून दाेन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटेल असा विश्वास त्यांना असतो.

पण, प्रत्यक्ष वाट्याला येते ते भलतेच. राहायलाच जागा नसेल तर शिक्षण पूर्ण करणार कसं, हा प्रश्न उभा राहताे, कारण बाहेर रूम करून राहावे इतके पैसे ताे उभे करूच शकत नाही. ही बाब विचारात घेऊन विद्यापीठाने मागेल त्या प्रत्येकाला वसतिगृह द्यावे, अशी मागणी केली.

यासाठी चिखलात ठिय्या मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.प्रत्येक विद्यार्थ्याला सरसकट वसतिगृह मिळाले पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. याच दृष्टीने मुलांचे वसतिगृह क्रमांक १० तातडीने सुरू करावे, जेणेकरून प्रवेश क्षमता वाढेल, असे निवेदनात म्हटले आहे. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने आश्वासन पत्र दिले असून, मागण्या विचाराधीन असल्याचे नमूद केले आहे, असे आंदाेलक म्हणाले.


 

या आहेत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या  

- तात्काळ गेस्ट व होस्टल शुल्क सुरू करावे

- मुलांचे होस्टेल क्र. १० तात्काळ सुरू करावे

- सर्व प्रवेशित विद्यार्थिनींना तात्काळ वसतीगृह उपलब्ध करावे

मागील वर्षापासून जे विद्यार्थी दुबार पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेत आहेत, म्हणजेच एकापेक्षा जास्त पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत, तर त्यांना वसतिगृह मिळणार नाही, असा अलिखित नियम विद्यापीठाने केला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला वसतिगृह पुरवू शकत नाही, यात प्रशासनाचे अपयश आहे. विद्यार्थ्यांची गैरसाेय न करता प्रत्येकाला प्रवेश मिळवून द्यावा; अन्यथा आम्ही राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते शांत बसणार नाही. प्रशासनाने तीव्र आंदोलन करण्यास आम्हाला भाग पाडू नये. - अक्षय कांबळे, सचिव, राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस 

 
वंचित, बहुजन, गरजू विद्यार्थी वेगळ्या ज्ञानशाखेत शिक्षण घेऊ इच्छित असेल तर त्याला होस्टेल नाकारणे उचित नाही. सदर प्रकार त्यांच्या शिक्षणाचा अधिकार हिरावून घेण्यासारखा आहे. या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो. प्रत्येक विद्यार्थ्याला होस्टेल मिळाले नाही, तर आंदोलन अजून तीव्र स्वरूपात केले जाईल. - सागर सोनकांबळे, डापसा

 दुबार पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृह नाकारणे म्हणजे त्यांना ‘सेकंडरी सिटिझन’ समजण्यासारखं आहे. प्रशासनाने यावर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र होणार यात शंका नाही. - सिद्धांत जांभूळकर, विद्यार्थी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाचे वसतिगृहाबाबतचे धोरण अन्यायकारक आहे. गरीब विद्यार्थ्यांच्या हक्कावर थेट घाव आहे. हे आम्ही कदापिही स्वीकारणार नाही. - सुलतान शाह, आजा समाज पार्टी

Web Title: Mud protest at Pune University; Students' angry demand for hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.