MPSC Exam : वयाची अट शिथिल करण्यासाठी स्पर्धा परीक्षार्थींनी केले आंदाेलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:05 IST2026-01-02T13:05:01+5:302026-01-02T13:05:23+5:30
- शास्री रस्त्यावर एकत्र येऊन व्यक्त केला संताप

MPSC Exam : वयाची अट शिथिल करण्यासाठी स्पर्धा परीक्षार्थींनी केले आंदाेलन
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा रविवारी (दि. ४) आहे. मात्र, या परीक्षेची जाहिरात तब्बल सात महिने उशिराने आल्याने अनेकांची संधी हुकली आहे. ही बाब विचारात राज्य सरकारने वयोमर्यादा वाढवून द्यावी, अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. यावर विविध पक्षांच्या नेत्यांनीही सकारात्मक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. तरीही सरकार निर्णय घेत नसल्याने पुण्यात मध्यवर्ती भागात शास्त्री रस्त्यावर गुरुवारी (दि. १) विद्यार्थ्यांनी आंदाेलन केले. परीक्षा ताेंडावर आली तरी वयोमर्यादेचे काेड सुटत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला.
राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) संयुक्त पूर्वपरीक्षा 'गट ब' आणि 'गट क'च्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यात काही संवर्गाच्या पदांसाठी एकही जागा देण्यात आलेली नाही. काही संवर्गांसाठी मागणीपेक्षा कमी जागा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षार्थींमध्ये नाराजी आहे. या जागा वाढवून देण्याची मागणी देखील केली जात आहे. पीएसआय वयोमर्यादा एक वर्षाने वाढ करावी, काही विभागाने शून्य जागा काढल्या आहेत.
राज्य लाेकसेवा आयोगातर्फे ६७४ पदांसाठी 'महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५' ची जाहिरात जुलै २०२५ मध्ये प्रसिद्ध झाली हाेती. त्यापैकी ३९२ पदे पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) संवर्गातील आहेत. यात वयोमर्यादा गणनेसाठी १ नोव्हेंबर २०२५ ही तारीख निश्चित केली आहे. परिणामी अवघ्या काही दिवसांच्या फरकाने हजारो विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. त्यामुळे पोलिस शिपाई भरती, संयुक्त पूर्वपरीक्षा या प्रमाणेच गट-ब (विशेषतः पीएसआय) परीक्षेसाठीही वयोमर्यादेत शिथिलता मिळावी, अशी मागणी करण्यात आली. 'एमपीएससी' मार्फत अराजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 'गट ब' आणि 'गट क' या दोन्ही गटांमधील १ हजार ६१२ पदांसाठी रविवारी परीक्षा घेतली जात आहे. यात 'गट ब'साठी ६७४ आणि 'गट क'साठी ९३८ पदे आहेत.
------------
संयुक्त पूर्व परीक्षा गट 'ब'च्या जागा :
सहायक कक्ष अधिकारी - ०३ पदे
राज्य कर निरीक्षक - २७९
दुय्यम निबंधक - ०
पोलिस उपनिरीक्षक - ३९२
----
संयुक्त पूर्व परीक्षा गट ‘क’च्या जागा
उद्योग निरीक्षक - ०९
तांत्रिक सहायक - ०४
कर सहायक - ७३
लिपिक टंकलेखक - ८५२
सहाय्य्क मोटार वाहन निरीक्षक - ०
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक - ०
राज्यातील लाखो विद्यार्थी अनेक महिन्यांपासून संयुक्त पूर्वपरीक्षा 'गट ब' आणि 'गट क'च्या जाहिरातीची प्रतीक्षा करीत हाेते. अखेर या पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली, परंतु काही संवर्गासाठी शून्य जागा आहेत. या दोन्ही जाहिरातीतील संबंधित जागांमध्ये तत्काळ वाढ करावी. तसेच नियाेजित परीक्षेसाठी वयाेमर्यादेची अट शिथिल करावी म्हणून विद्यार्थ्यांनी आंदाेलन पुकारले आहे. - महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन