Mpsc Exam : विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका: 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांची राज्य सरकारला भावनिक साद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 18:38 IST2021-04-08T18:29:29+5:302021-04-08T18:38:53+5:30
लराज्यात कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली असून, काही परिक्षार्थींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Mpsc Exam : विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका: 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांची राज्य सरकारला भावनिक साद
पिंपरी : कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने घेण्यात येणार संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलावी अशी जोरदार मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. समाज माध्यम आणि सरकारकडे निवेदनाद्वारे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. एमपीएससी तर्फे येत्या ११ एप्रिल रोजी ८०६ जागांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.
राज्यात कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली असून, काही परिक्षार्थींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेश, बिहारने विविध खात्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. केंद्रीय जल मार्ग विभागाने नॅव्हीगेशनल असिस्टंट आणि टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक) पदाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी करीत आहेत. एमपीएससी समन्वय समितीने कोरोनामुळे बहुतांश विद्यार्थ्यांची मानसिकता परीक्षा पुढे ढकलण्याची असल्याचे निवेदन राज्य सरकारला दिले आहे. आता विद्यार्थ्यांनी समाज माध्यमावर हॅश टॅग पोस्टपोन एमपीएससी अशी मोहीम सुरू केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-----
मार्च महिन्यात झालेल्या परीक्षेनंतर अनेकांना कोरोना झाला. काहींचे आई, वडील, बहीण, आप्त कोरोना बाधित आहेत. अनेक जण अकरा एप्रिलची परीक्षा देता यावी यासाठी अंगावर आजार काढत आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी.
निकिता शिरिते, एमपीएससी विद्यार्थी
----
माझ्या रुम मधील एमपीएससीची तयारी करणाऱ्या काही मुली आजारी आहेत. जवळपास तीस टक्के मुले आजारी आहेत. सरकारने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नये. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलावी. सारिका चोले, एमपीएससी विद्यार्थी
-----
ट्विटर प्रतिक्रिया सद्यस्थिती लक्षात घेऊन ११ एप्रिलला होणारी परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी परीक्षार्थी करीत आहेत. या मागणीचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा.
कमलाकर शेटे
-/-
राज्यातील तीस टक्के विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आयोगाचा परीक्षा घेण्याचा अट्टाहास आमचे व आमच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात टाकू शकतो. महाराष्ट्रासाठी हा सायलेंट बॉम्ब ठरेल.
- दीपेश मोरे.
--/// -----