ताथवडे गैरव्यवहार प्रकरणातील दस्त रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 10:40 IST2025-12-07T10:38:16+5:302025-12-07T10:40:02+5:30
- पशुसंवर्धन विभाग सोमवारी दाखल करणार अर्ज

ताथवडे गैरव्यवहार प्रकरणातील दस्त रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव
पुणे : ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाची ६ हेक्टर ३२ आर जमीन खासगी मालकाच्या नावे करण्याचा गैरप्रकार उघड झाल्यानंतर आता हा दस्त रद्द करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग दिवाणी न्यायालयात जाणार आहे.
या संदर्भात सरकारी वकिलांना कागदपत्रे देण्यात आली असून अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. दिवाणी न्यायालयात सोमवारी (दि. ८) अर्ज दाखल करण्यात येईल, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिली. हा दस्त रद्द करण्याची प्रक्रिया न्यायालयाकडूनच पूर्ण केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ताथवडे (ता. मुळशी) येथील सर्व्हे क्र. २० मधील एकूण ६ हे ३२ आर जमिनीच्या खरेदीखत दस्त क्र. ६८५/२०२५ च्या नोंदणीत ही अनियमितता झाली. या जमिनीवर पशुसंवर्धन आयुक्तांचा ताबा असून, राज्य सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय खरेदी-विक्रीस बंदी असलेली मालमत्ता आहे. दस्त नोंदणीच्या वेळी हवेली क्र. १७ या कार्यालयातील प्रभारी सहदुय्यम निबंधक व वरिष्ठ लिपिक विद्या बडे यांनी जुना सातबारा लावलेला दस्त नोंदवून घेतला. सातबारा उताऱ्यावर ‘शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय खरेदी-विक्रीस बंदी’ हा प्रतिबंधात्मक शेरा असतानाही दस्त नोंदणी करण्यात आली.