पुण्यात मास्क कारवाई करणार्या पोलिसाच्या अंगावरच घातली मोटारसायकल; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 13:00 IST2020-10-17T12:58:18+5:302020-10-17T13:00:02+5:30
शहरात पोलिसांकडून चौकाचौकात विनामास्क घालून फिरणार्यांविरोधात मोठी कारवाई सुरु आहे.

पुण्यात मास्क कारवाई करणार्या पोलिसाच्या अंगावरच घातली मोटारसायकल; दोघांना अटक
पुणे : मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर मोटारसायकल घालून त्यांना जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
सौरभ लहु उमेर (वय २०, रा़ साईनगर, हिंगणे) आणि मयुर धनंजय चतुर (वय २६, रा़ हिंगणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई बालाजी बाबुराव पांढरे (वय २७) यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
बालाजी पांढरे हे शिवाजीनगर वाहतूक शाखेत नेमणुकीला आहेत. शुक्रवारी ते वीर चाफेकर चौकात विनामास्क कारवाई करीत होते. त्यावेळी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सौरभ व मयुर हे मोटारसायकलवरुन तेथे आले. त्यांनी मास्क घातला नसल्याने त्यांना अडवून पांढरे यांनी पावती करण्यास सांगितले. तेव्हा आरोपींनी त्यांना शिवीगाळ करुन गाडीने धक्का मारुन खाली पडले. त्यानंतर पांढरे यांच्या पायावरुन गाडी घालून दुखापत करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोघांना पकडून अटक केली असून त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणण्यासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
शहरात पोलिसांकडून चौकाचौकात विनामास्क घालून फिरणार्यांविरोधात मोठी कारवाई सुरु आहे. अगदी नाकावरुन थोडाजरी मास्क खाली आला असला तरी पोलीस विनामास्क कारवाई करीत असल्याने अनेक ठिकाणी वादावादीचे प्रसंग पहायला मिळत आहेत.