प्रियकरासाठी पोटच्या मुलीला संपवलं; आईच्या कृत्याने महाराष्ट्र हादरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 16:00 IST2023-03-08T15:58:35+5:302023-03-08T16:00:09+5:30
एक धागा सापडला अन् पोलीस चिमुरडीच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचले...

प्रियकरासाठी पोटच्या मुलीला संपवलं; आईच्या कृत्याने महाराष्ट्र हादरला
पुणे : अवघ्या तीन वर्षाची ती. मोठ्या विश्वासाने तिने आईसोबत अकोले ते पुणे प्रवास केला होता. मात्र तिला हे ठाऊक नव्हतं तिचा हा प्रवास शेवटचा असेल. कारण सखी आईच तिचा कर्दनकाळ ठरणार होती.अनैतिक संबंधात अडथळा ठरत होती म्हणून जन्मदात्या आईनेच तिच्या नरडीचा घोट घेतला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाटही लावली. पण एक धागा सापडला अन् पोलीस चिमुरडीच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचले.
दोन मार्च रोजी खडकी रेल्वे स्टेशन जवळील मोकळ्या जागेत एका तीन वर्षे मुलीचा मृतदेह सापडला होता. गळा दाबून तिचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. कुठलाही पुरावा मागे नसल्याने या चिमूरडीची ओळख पटवण्यात अडथळे येत होते. मात्र या चिमुरडीच्या अंगावर जी शॉल होती त्यावरून पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. त्यांनी दोघांना अटक केली. धक्कादायक म्हणजे यामध्ये आरोपी असलेली एक महिला या चिमूरडीची सखी आई होती. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने या चिमुरडीला आईनेच प्रियकरासह मिळून ठार मारले होते.
आरोपी महिलेचे यापूर्वी लग्न झालेले आहे. तिला आणखी एक मुलगी आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच ती प्रियकरासह पुण्यात पळून आली होती. मात्र रात्री झोपत असताना ही चिमुरडी रडायची, त्याचा त्रास या दोघांना व्हायचा. यामुळेच त्यांनी या तीन वर्षीय निष्पाप मुलीचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह निर्जन ठिकाणी फेकूनही दिला. मात्र कोणताही पुरावा मागे नसताना अतिशय कौशल्याने तपास करत पोलिसांनी या दोघांनाही बेड्या ठोकल्या.