सासुरवाडीने दिला त्रास, जावयाने केली आत्महत्या; चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा
By नितीश गोवंडे | Updated: April 17, 2024 17:21 IST2024-04-17T17:21:08+5:302024-04-17T17:21:58+5:30
याप्रकरणी सासरकडील नातेवाईकांविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे...

सासुरवाडीने दिला त्रास, जावयाने केली आत्महत्या; चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा
पुणे : सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. याप्रकरणी सासरकडील नातेवाईकांविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सिजु ख्रिस्तोफर जोसेफ (३८, रा. निर्मला अपार्टमेंट, वडगावशेरी) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत सिजू जोसेफ यांच्या आईने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिजू इलेक्ट्रिशियन होते. ते सायंकाळी कामावरून घरी आले. त्यावेळी घरात कोणी नव्हते. सिजू यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सिजू यांनी खोलीचा दरवाजा बंद केला होता. कुटुंबीयांनी दरवाजा वाजवला. प्रतिसाद न दिल्याने कुटुंबीयांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. दरवाजा तोडला असता सिजू यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
सासरकडील नातेवाईकांनी सिजू यांना त्रास दिल्याने ते गेल्याने काही दिवसांपासून तणावात होते. नैराश्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद त्यांच्या आईने दिली. आईने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक माने करत आहेत.