आईशपथ, उद्योगनगरीत बिबट्या दिसला रे..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 17:46 IST2025-12-05T17:45:57+5:302025-12-05T17:46:27+5:30
दिशाभूल करणारे एडिटेड फोटो होत आहेत व्हायरल

आईशपथ, उद्योगनगरीत बिबट्या दिसला रे..!
पिंपरी : शहरात बिबट्या फिरत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. विविध भागांतील फोटो आणि व्हिडीओ शेअर करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, यांपैकी अनेक पोस्ट्स एडिट केलेल्या, दिशाभूल करणाऱ्या आणि तथ्यहीन असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
शहरातील वाकड, रावेत, चिंचवड, मोशी, भोसरी अशा अनेक ठिकाणांची चित्रे एडिट करून त्या ठिकाणी बिबट्या दिसल्याचे दाखविले जात आहे. काही जण तर रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजवरही बिबट्या ओव्हरलॅप करून व्हिडीओ तयार करत असल्याचे समोर आले आहे. या खोट्या पोस्ट्समुळे नागरिकांमध्ये अनावश्यक घबराट निर्माण होत असून, पालक आपल्या मुलांना बाहेर खेळायला पाठवण्यासही टाळाटाळ करत आहेत.
काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काही भागात बिबट्या दिसल्याच्या घटनांमुळे सर्वत्र सतर्कता वाढविण्यात आली आहे. शहरात बिबट्या आढळल्याची अधिकृत माहिती अजूनपर्यंत प्राप्त झालेली नाही. सोशल मीडियावर फिरणारे बरेचसे फोटो व व्हिडीओ बनावट असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे वनविभाग व महापालिका प्रशासनाचेही म्हणणे आहे.
प्रशासनाचे आवाहन
- अप्रमाणित संदेश, फोटो किंवा व्हिडीओ पुढे शेअर करू नयेत.
- अधिकृत स्त्रोतांवरीलच माहितीवर विश्वास ठेवावा.
- कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ कंट्रोल रूम किंवा वनविभागाशी संपर्क साधावा.