पुण्यात बांगलादेशींपेक्षा येमेन, युगांडाचे घुसखाेर अधिक; कडक कारवाई होणार, आयुक्तांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 11:59 IST2025-01-25T11:58:18+5:302025-01-25T11:59:06+5:30

नागरिक वैद्यकीय उपचार आणि शिक्षणाच्या नावाखाली पुण्यात येतात, यानंतर त्यांच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतर देखील ते शहरातच वास्तव्य करतात

More infiltrators from Yemen and Uganda than Bangladeshis in Pune; Strict action will be taken, assures Commissioner | पुण्यात बांगलादेशींपेक्षा येमेन, युगांडाचे घुसखाेर अधिक; कडक कारवाई होणार, आयुक्तांचे आश्वासन

पुण्यात बांगलादेशींपेक्षा येमेन, युगांडाचे घुसखाेर अधिक; कडक कारवाई होणार, आयुक्तांचे आश्वासन

पुणे: अभिनेता सैफ अली खानच्या फ्लॅटमध्ये बांगलादेशी घुसखोराने केलेल्या कृत्यानंतर महाराष्ट्र पोलिस सक्रिय झाले आहेत. पुण्यातदेखील परदेशी घुसखोरांचा शोध घेतला जात आहे. शहरात बांगलादेशी घुसखोरांपेक्षा येमेन, युगांडा, अफगाणिस्तान आणि नायजेरिया येथील लोक अधिक असल्याचे पोलिसांकडे असलेल्या मागील ५ वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. यानुसार, येमेन येथील ६३, युगांडा येथील ५३, अफगाणिस्तानातील २८ आणि नायजेरियातील १७ नागरिकांना अटक केली आहे.

बांगलादेशातून आलेले केवळ चार घुसखोर असल्याचे पुढे आले असून, त्यांना त्यांच्या देशात परत पाठविण्यासाठी पुणे पोलिसांना जादा परिश्रम घ्यावे लागत आहेत. अधिक माहितीनुसार, गेल्या ५ वर्षांमध्ये २५२ घुसखोरांना पोलिसांनी पकडले. यामध्ये पाकिस्तानचे ३, थायलंडचे २०, अमेरिकेचे १२, दक्षिण सुदानचे ५ यासह ३५ वेगवेगळ्या देशांतील घुसखोर जे कोणत्याही व्हिसाशिवाय अथवा व्हिसाचा कालावधी संपल्यानंतरदेखील पुण्यात वास्तव्य करत होते. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना पोलिसांनी सांगितले की, येमेन आणि युगांडा येथील नागरिक वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली, तर नायजेरियन शिक्षणाच्या नावाखाली शहरात येतात. यानंतर त्यांच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतरदेखील ते शहरातच वास्तव्य करतात. अशा लोकांना शोधून पोलिस त्यांच्यावर कारवाई करतात. पोलिसांपासून वाचण्यासाठी दलाल त्यांना राष्ट्रगीत शिकवतात, अशी माहितीदेखील समोर आली आहे. १६ जानेवारी रोजी स्वारगेट पोलिसांनीदेखील २००४ सालापासून देशात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला पकडले होते. यावेळी त्याच्याकडून ७ आधार कार्ड, ७ पॅन कार्ड, ४ पासपोर्ट, पाकिस्तानी चलनी नोट, सौदी अरेबिया, कुवेत, कतार, मलेशियाचे चलन जप्त करण्यात आले होते.

घुसखोरांवर कडक कारवाईच्या केंद्राच्या सूचना

केंद्रीय गृह विभागाकडूनदेखील महाराष्ट्रातील परदेशी घुसखोरांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना देण्यात आल्या आहेत. राज्यातील बांगलादेशी आणि म्यानमार येथून आलेल्या घुसखोरांना शोधून त्यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी आदेश केंद्राकडून देण्यात आले आहेत.

शहरात अवैध पद्धतीने वास्तव्य करणाऱ्या घुसखोरांविरोधात कडक कारवाई केली जाईल. त्याबाबतचे आदेशदेखील दिले आहेत. बनावट कागदपत्रे बनवणाऱ्यांवरदेखील कायदेशीर कारवाई केली जाणार. तसेच शहरात सापडलेल्या घुसखोरांना त्यांच्या देशात पाठविण्याबाबतदेखील योग्य ती पावले उचलली जातील. - अमितेश कुमार, पोलिस आयुक्त

Web Title: More infiltrators from Yemen and Uganda than Bangladeshis in Pune; Strict action will be taken, assures Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.