पुणे जिल्ह्यात अनधिकृत वाळू उपसा व चोरीमध्ये मोठी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 20:35 IST2020-01-15T20:31:47+5:302020-01-15T20:35:14+5:30
दौंड, शिरुर आणि हवेली तालुक्यातील वाळू चोर महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या एक पाऊल पुढेच

पुणे जिल्ह्यात अनधिकृत वाळू उपसा व चोरीमध्ये मोठी वाढ
पुणे : पर्यावरणाच्या परवानग्या मिळत नसल्याने गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात वाळूचे लिलावच होऊ शकले नाही. जिल्हा प्रशासनाकडून वाळू लिलाव जाहिर होत नसले तरी सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सर्वच तालुक्यांमध्ये अनधिकृत वाळू उपसा व वाळू चोरी सुरुच आहे. ही वाळू चोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असलेले प्रयत्न व उपाययोजना केवळ औपचारिकता असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील प्रामुख्याने दौंड, शिरुर आणि हवेली तालुक्यातील वाळू चोर महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या एक पाऊल पुढेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवार (दि.१५) रोजी हवेली आणि शिरुर तालुक्यातील वाळू रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र आढावा बैठक घेतील. यावेळी शिरुरचे आमदार अशोक पवार, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख बैठकीला उपस्थित होते. यापूर्वी दौंड तालुक्यातील वाळू चोरी रोखण्यासाठी देखील जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना बैठक घ्यावी लागली होती. एवढे सर्व करूनही वाळू चोरांना लगाम बसलेला नाही अद्यापही वाळू चोरी होत असून त्यामागे महसूल पोलिस प्रशासनातील अधिकारी यांचे लागेबांधे असल्याचेही दिसून आले आहे.
बुधवारी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी राम यांनी वाळू चोरीस आळा घालण्यासाठी महसूल व पोलीस विभागाच्या वतीने वाळू चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश दिले. ते म्हणाले, अवैध वाळू वाहतुकीस आळा घालण्यासाठी ज्या गावात वारंवार वाळू चोरीचे प्रकार घडत आहेत, अशा गावांची व वाळू चोरी करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची यादी तयार करावी. पोलीस स्टेशन निहाय भरारी पथके तयार करावीत. तसेच तपासणीसाठी चेकपोस्ट तयार करावेत. वाळू चोरीचे प्रकार आढळून येणाऱ्या भागांतील संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आढळून आल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी.