अवैधरित्या दारू सप्लाय करणाऱ्याकडून दारू विक्री करणाऱ्या महिलेवर बलात्काराचा प्रयत्न; बारामतीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 16:42 IST2023-01-29T15:37:14+5:302023-01-29T16:42:03+5:30
आरोपीवर बलात्कारासह अनुसुचित जाती व जमाती प्रतिबंधक कायद्या नुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अवैधरित्या दारू सप्लाय करणाऱ्याकडून दारू विक्री करणाऱ्या महिलेवर बलात्काराचा प्रयत्न; बारामतीतील घटना
सांगवी (बारामती): माळेगाव खु. (ता.बारामती) येथे अवैधरित्या दारू सप्लाय करणाऱ्याकडून दारू विक्री करणाऱ्या पस्तीस वर्षीय महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत बारामती तालुक्यातील पूर्वेकडील गावातील महिलेने माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पीडित महिलेने बलात्कारासह अनुसुचित जाती व जमाती प्रतिबंधक कायद्या नुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी नवनाथ गव्हाणे, रा. माळेगाव खुर्द (ता. बारामती, जि.पुणे ) गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.आरोपी गव्हाणे फरार झाला असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिली. गुरुवार (दि. 26) रोजी 2 वाजण्याच्या सुमारास माळेगाव खुर्द येथील कॅनॉलजवळील असलेल्या नाव माहित नसलेल्या बिल्डींगमधील फ्लॅटमध्ये हा प्रकार घडला आहे.
पीडित महिला या (26 रोजी) दुपारी 2 वाजता आरोपी नवनाथ गव्हाणे यांच्याकडे दारू आणण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी आरोपी गव्हाणे याने माळेगाव खुर्द येथील कॅनॉलजवळील असलेल्या बिल्डींगमधील फ्लॅटमध्ये दारु घेऊन जाण्याच्या बहाण्याने फ्लॅटमध्ये पीडितेला घेऊन गेला. यावेळी आरोपी गव्हाणेने फ्लॅटचा दरवाजा बंद करुन पीडितेवर जबरदस्तीने संभोग करण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपीची पत्नी अश्विनीला याबाबत काही सांगितले तर सावकारकीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी पीडितेला दिली. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे अधिक तपास करीत आहेत.