मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार पुण्यातील नवनियुक्त शहर पदाधिकाऱ्यांची 'शाळा' 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 10:23 PM2021-03-10T22:23:48+5:302021-03-10T22:23:56+5:30

ही कार्यकारिणी अधिक आक्रमकपणे काम करणार असून महापालिका निवडणूकांच्या अनुषंगाने प्रभाग समित्यांच्या स्तरावर नागरी प्रश्न आणि लोकप्रतिनिधींच्या गैरप्रकारांबाबत आंदोलने छेडणार असल्याचे शहराध्यक्ष तथा पालिकेतील गटनेते वसंत मोरे यांनी सांगितले.

MNS president Raj Thackeray to take meeting of newly appointed leaders | मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार पुण्यातील नवनियुक्त शहर पदाधिकाऱ्यांची 'शाळा' 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार पुण्यातील नवनियुक्त शहर पदाधिकाऱ्यांची 'शाळा' 

Next


पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे येत्या शुक्रवारी शहरातील नवनियुक्त पदाधिका-यांची  ‘शाळा’ घेणार आहेत. शहराध्यक्ष बदलण्यात आल्यानंतर आता शहराची नवी कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत. (MNS president Raj Thackeray to take meeting of newly appointed leaders)

ही कार्यकारिणी अधिक आक्रमकपणे काम करणार असून महापालिका निवडणूकांच्या अनुषंगाने प्रभाग समित्यांच्या स्तरावर नागरी प्रश्न आणि लोकप्रतिनिधींच्या गैरप्रकारांबाबत आंदोलने छेडणार असल्याचे शहराध्यक्ष तथा पालिकेतील गटनेते वसंत मोरे यांनी सांगितले.

मोरे आणि मनसे नेते बाबू वागस्कर यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मनसेकडूनही तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. मनसेचे 2017 साली झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती. यावेळीही तेच ध्येय ठेवण्यात आल्याचे मोरे म्हणाले. नवीन कार्यकारिणीमध्ये माजी नगरसेवकांना समाविष्ट करुन घेत मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असून विभागप्रमुखपदी नव्या दमाचे कार्यकर्ते नेमण्यात आल्याचे मोरे यांनी सांगितले.

नवीन कार्यकारिणीमध्ये उपशहर अध्यक्ष, शहर सचिव, शहर संघटक, विभाग अध्यक्ष, विभाग सचिव, कार्यालयीन कामकाज, प्रसार माध्यम सचिवांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. मनसेने जाहिर केलेल्या 45 जणांच्या कार्यकारिणीमध्ये (फादर बॉडी) एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. यावर मनसेने महिलांची स्वतंत्र शाखा अस्तित्वात असून त्यांनाही याच प्रकारे पदे दिली जाणार असल्याचे सांगितले. परंतु, अन्य पक्षांप्रमाणे फादर बॉडीमध्ये स्थान देण्याबाबत भविष्यात विचार केला जाणार असल्याचे मनसे नेते बाबू वागस्कर यांनी सांगितले.  

नवीन शहर कार्यकारिणीला मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मान्यता घेण्यात आली आहे. आगामी पालिका निवडणूका, आंदोलने याबाबतचे सर्व नियोजन या कार्यकारिणीद्वारे केले जाणार आहेत. वर्षभरानंतर आढावा घेऊन काही बदलही केले जातील. येत्या शुक्रवारी राज ठाकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात येणार असल्याचे वागस्कर यांनी सांगितले.

Web Title: MNS president Raj Thackeray to take meeting of newly appointed leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.