मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावणार का? राज ठाकरेंच्या भेटीसाठी निघालेले वसंत मोरे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 09:33 AM2022-04-11T09:33:53+5:302022-04-11T09:35:40+5:30

राज ठाकरेंच्या भेटीसाठी पुण्याहून निघालेले वसंत मोरे थेट अन् स्पष्टच बोलले

mns leader vasant more leaves from pune to meet party president raj thackeray | मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावणार का? राज ठाकरेंच्या भेटीसाठी निघालेले वसंत मोरे स्पष्टच बोलले

मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावणार का? राज ठाकरेंच्या भेटीसाठी निघालेले वसंत मोरे स्पष्टच बोलले

googlenewsNext

पुणे: मशिदींवरील भोंगे सरकारनं उतरवावेत, अन्यथा मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावू, अशी भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत घेतली. त्यानंतर मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्यास सुरुवात केली. मात्र काही नेत्यांची राज यांच्या भूमिकेमुळे अडचण झाली. पुण्यातील मनसेचे महत्त्वाचे नेते वसंत मोरेंनी त्यांची अडचण जाहीरपणे बोलून दाखवली. त्यानंतर त्यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं. मोरे सातत्यानं राज यांच्या भेटीसाठी वेळ मागत होते. अखेर आज मोरे आणि राज ठाकरेंची भेट होणार आहे. त्यासाठी मोरे पुण्यातून मुंबईला रवाना झाले आहेत.

राज ठाकरेंनी मला भेटीसाठी बोलावलं आहे. राज यांच्या भेटीसाठी पहिल्यांदाच जातोय अशातला काही भाग नाही. पण आता पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे, असं मुंबईच्या दिशेनं रवाना झालेल्या मोरेंनी सांगितलं. शहरातील पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत माझ्या काही अडचणी आहेत. त्या मी राज ठाकरेंच्या कानावर घालणार असल्याचं मोरेंनी सांगितलं. मोरेंनी मशिदीवरील भोंग्यांच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतल्यानंतर पुण्यातील मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत मोरेंवर जोरदार टीका केली होती. 

पक्षप्रमुखांच्या भूमिकेला छेद देणारी भूमिका तुम्ही मांडली. राज यांच्या भेटीनंतर तुमची काय भूमिका असेल? तुम्ही भोंगे लावण्यात आलेल्या मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावणार का? असे प्रश्न मोरेंना विचारण्यात आले. त्यावर साहेबांच्या भूमिकेला मी छेद दिलेला नाही. तितकी माझी पात्रता नाही, असं मोरे म्हणाले. राज ठाकरे मार्गदर्शन करतील. त्यावरून पुढे काय करायचं ते ठरवता येईल, असं मोरेंनी सांगितलं.

राज ठाकरेंनी पक्षाची भूमिका मांडली. आता लोकप्रतिनिधी म्हणून मी माझी भूमिका त्यांच्यासमोर मांडेन. माझी होत असलेली अडचण त्यांना सांगेन. गेल्या १५ वर्षांपासून मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून मी निवडून येणंही गरजेचं आहे, असं मोरेंनी म्हटलं. आज शिवतीर्थावर राज ठाकरे आणि वसंत मोरेंची भेट होईल. या भेटीनंतर मोरे काय निर्णय घेतात त्याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

आतापर्यंत काय काय घडलं?
राज यांच्या गुढीपाडव्यातील भाषणांनंतर वसंत मोरेंनी मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावणार नसल्याचं म्हणत स्वत:ची अडचण सांगितली. माझ्यासोबत अनेक मुस्लिम कार्यकर्ते आहेत. पक्षाच्या चढउताराच्या काळात त्यांनी मला खंबीरपणे साथ दिली आहे, असं मोरे म्हणाले. पक्षाच्या भूमिकेशी विसंगत भूमिका मांडल्यानं त्यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं. राज यांनी पुण्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावलं. मात्र मोरेंना निमंत्रण देण्यात आलं नाही. गेल्या आठवड्यापासून मोरे राज यांच्या भेटीसाठी वेळ मागत होते.

Web Title: mns leader vasant more leaves from pune to meet party president raj thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.