Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 10:29 IST2025-09-18T10:29:46+5:302025-09-18T10:29:58+5:30
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारणावरून गोळीबार झाल्याने पुण्यात पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
पुणे: पुण्यात कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील गुंडांनी एका व्यक्तीवर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गाडीला साईड न दिल्याच्या किरकोळ कारणावरून कोथरूड भागात मुठेश्वर मित्र मंडळासमोर मध्यरात्री ही घटना घडली. प्रकाश धुमाळ (वय ३६) असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सध्या त्याच्यावर कोथरूडमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी टोळीतील मयुर कुंभारे, मुसा शेख, रोहीत आखाड आणि गणेश राऊत यांना अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांच्या दहशतीने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीला साईड न दिल्यामुळे हा वाद झाल्याचे कळते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश धुमाळ हा रात्री मित्रांसोबत उभा होता. त्यावेळी दुचाकीला साईड न दिल्यामुळे या घायवळच्या टोळीतील लोकांसोबत त्याचा वाद झाला. त्यानंतर टोळीतील मयुर कुंभारे, मुसा शेख, रोहीत आखाड आणि गणेश राऊत यांनी गोळीबार केला. मयुर कुंभारेने तीन गोळ्या झाडल्या. यात प्रकाश धुमाळच्या मानेला आणि मांडीला गोळी लागली. गोळ्या लागल्यानंतर प्रकाश तशाच अवस्थेत आपला जीव वाचवण्यासाठी पळत होता. त्या ठिकाणी रक्ताचे आणि पायाचे ठसे दिसून येत आहेत. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला, परिसरात त्यांचं रक्त पडल्याचं दिसून आले आहे. कोथरुडमधील सह्याद्री रुग्णालयात जखमीवर उपचार सुरु आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे तो आपल्या मित्रांसोबत बोलत उभा होता रस्ता दिला नाही. इतक्या शुल्लक करण्यासाठी हा गोळीबार करण्यात आलेला आहे. त्यामुळे पुणे शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.