Maharashtra Bandha: श्रीरामाचा खोटा जप करणाऱ्या भाजपकडून देशात रावणाचे कृत्य; विश्वजित कदम यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 15:21 IST2021-10-11T14:03:11+5:302021-10-11T15:21:29+5:30
पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंदच्या निमित्ताने आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Maharashtra Bandha: श्रीरामाचा खोटा जप करणाऱ्या भाजपकडून देशात रावणाचे कृत्य; विश्वजित कदम यांचा हल्लाबोल
पुणे : उत्तरप्रदेश मधील लखीमपूर (lakhimpur) घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक पुकारण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यात ठिकठिकाणी व्यापारी वर्ग, भाजी मार्केट यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रॅली, मोर्चा काढून बंद ला पाठिंबा देत आहेत. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंदच्या निमित्ताने आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
''एका बाजूने महाविकास आघाडी (mahavikas aghadi) सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन चांगले काम करत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांवर जीवघेण्यापर्यंतचे अत्याचार सुरु आहेत. आता नवरात्रीचे दिवस सुरु आहेत. दसऱ्याला रावण दहन केले जाते. श्रीरामाचा खोटा जप करणाऱ्या भाजपकडून देशात रावणाचे कृत्य सुरु आहे. सर्व शेतकरी संघटना, आघाडीचे तिन्ही पक्ष, सर्वसामान्य जनता, एकत्र येऊन लखीमपूर घटनेचा निषेध करत भाजप रावणाचे दहन करणार आहोत. असा हल्लाबोल कदम यांनी केंद्रावर (central government) केला आहे.''
''शेतकरी कायद्याच्या विरोधात अन्नदाता अकरा महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. देशाचे पंतप्रधान केंद्रातील मंत्री त्यांच्याकडे डुंकूनही बघत नाहीत. त्यानंतर लखीमपूर घटनेत आपले शेतकरी भावंडं आंदोलन करताना त्यांना चिरडून टाकण्याचं काम भाजप मंत्र्याच्या मुलाने केले आहे. आपल्या देशातील ही घटना अतिशय निंदनीय असल्याचे ते म्हणाले आहेत.''
जातीवादाला रोखण्यासाठी महाविकास आघाडी तयार झाली
''शेतकरी आपला अन्नदाता आहे. आपले पूर्वज कशी ना कधी शेतकरी होते. याआधी सुद्धा भाजपने शेतकरी आंदोलनात अन्नदात्यावर गोळीबार करून शेतकऱ्यांची हत्या केली होती. आता हि लखीमपूरची घटना घडली आहे. देशात जातीवाद वाढत चालला होता. त्याला रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकार तयार केले. दोन महिन्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांचे १९ हजार कोटींचे कर्जमाफ केले. याच काळात नकळत फायदा शेतकऱ्यांना झाला. त्यामध्ये हे भाजप सरकार शेतकऱ्यांवर अत्याचार करत आहे. अत्याचारी रावणाचे दहन करण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आली आहे.''