चौदा ऑगस्टच्या मध्यरात्रीत लाखो फोटो अपलोड; २३ हजार अयोग्य फोटो ‘डिलीट’

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: August 22, 2022 02:43 PM2022-08-22T14:43:19+5:302022-08-22T14:43:33+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रध्वजासोबतच्या दीड लाखांपेक्षा अधिक फोटो अपलाेड होण्याच्या विश्वविक्रमाची नाेंद १५ ऑगस्टला गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली

Millions of photos uploaded at midnight on the fourteenth of August 23 thousand inappropriate photos 'deleted' | चौदा ऑगस्टच्या मध्यरात्रीत लाखो फोटो अपलोड; २३ हजार अयोग्य फोटो ‘डिलीट’

चौदा ऑगस्टच्या मध्यरात्रीत लाखो फोटो अपलोड; २३ हजार अयोग्य फोटो ‘डिलीट’

googlenewsNext

पुणे : ‘हर घर तिरंगा’ या राष्ट्रव्यापी कार्यक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रध्वजासोबतच्या दीड लाखांपेक्षा अधिक फोटो अपलाेड होण्याच्या विश्वविक्रमाची नाेंद १५ ऑगस्टला गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. त्याआधी १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर अवघ्या काही तासांतच पावणेदाेन लाख फाेटाेंमधून जवळपास २३ हजार अयाेग्य फाेटाे वगळण्यात आले. हे अशक्य काम ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ प्रणालीमुळे शक्य झाले.

लाखो फोटो काही तासांत प्रक्रिया करून याेग्य ते गिनीज बुकला द्यायचे होते. विद्यापीठाने ही अवघड जबाबदारी तंत्रज्ञान विभाग अधिष्ठाता डॉ. आदित्य अभ्यंकर व टीमकडे सोपवली हाेती. १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर फाेटाेंची साइज व सर्व एकाच फाॅरमॅटमध्ये आणणे असे पूर्व-प्रोसेसिंग पहाटे ३ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आले. त्यानंतर यामध्ये मुद्दाम वा अनावधानाने राष्ट्रध्वजाचा अवमान हाेईल असे संवेदनशील फाेटाे, एकाच व्यक्तीने अपलाेड केलेले अनेक फाेटाे व राष्ट्रध्वजाला हात न लावलेले, ध्वज मागे व नागरिक पुढे असलेले असे फाेटाे अवघ्या काही तासांत काढायचे हाेते. हे तीन प्रकारचे फाेटाे काढून टाकण्याची मोठे आव्हान होते. जे मनुष्यबळाद्वारे एकेक करून ९ तासांत बाजूला काढणे शक्य नव्हते.

मात्र, याकरिता तंत्रज्ञान विभागानेच विकसित केलेली पेटेंटेड कृत्रिम बुध्दिमत्ता संगणक प्रणाली (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) धावून आली. अवघ्या काही तासांतच या प्रणालीने तीनही प्रकारचे फाेटाे त्यामध्ये दिलेल्या आज्ञावलीनुसार बाजूला केले. त्यानंतर चेहऱ्यांवरून माणसे ओळखून (फेस रिकग्निशन) १ लाख ५२ हजार ५५९ फाेटाेंची अंतिम संख्यादेखील निश्चित केली. तसेच हे काम बराेबर हाेतेय का हे पाहण्यासाठी ३० इंजिनिअरदेखील हाेते. सकाळी ८ वाजताच सर्व काम पूर्ण झाले.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (एआय) नेमके काय केले?

- ‘एआय’ने चित्रात व्यक्ती व ध्वज आहे, त्याने ध्वज हाताने पकडलेला असणे, ध्वज पूर्ण दिसताेय का, चेहरा पूर्ण दिसताेय का हे निश्चित केले.
- प्रत्येक चेहऱ्याचे २८ प्रकारे विश्लेषण करण्यात आले. आलेला प्रत्येक फाेेटाे एकमेकांसाेबत पडताळले. त्यामुळे डुप्लिकेट फाेटाे वगळण्यास मदत झाली.
-- अत्यंत ताकदीचे नाेडल सर्व्हर संगणक या कामाकरिता वापरले गेले.

३८ तास अविश्रांत मेहनत घेऊन एकही चूक होऊ दिली नाही

या प्रक्रियेत एकही चूक झाली असती, तर संपूर्ण विक्रम निष्फळ होऊ शकला असता, पण तंत्रज्ञान पथकाने ३८ तास अविश्रांत मेहनत घेऊन एकही चूक होऊ दिली नाही. विशिष्ट वेळेपूर्वी सर्व प्रक्रिया यशस्वी करून दाखवली. देशाच्या कामी माझ्या पीएच.डी. विद्यार्थांनी दिलेले योगदान विशेष असून त्याचा सानंद अभिमान मनी आहे. - प्रा. डॉ. आदित्य अभ्यंकर, संचालक, तंत्रज्ञान प्रशाला, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

Web Title: Millions of photos uploaded at midnight on the fourteenth of August 23 thousand inappropriate photos 'deleted'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.