लाखोंच्या जनसागराची विजयस्तंभाला मानवंदना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:44 IST2026-01-02T12:43:45+5:302026-01-02T12:44:13+5:30
कोरेगाव भीमा : शौर्याचे प्रतीक असणाऱ्या विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून लाखोंचा जनसमुदाय भीमा कोरेगाव येथे जमला. हातामध्ये निळे झेंडे ...

लाखोंच्या जनसागराची विजयस्तंभाला मानवंदना
कोरेगाव भीमा : शौर्याचे प्रतीक असणाऱ्या विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून लाखोंचा जनसमुदाय भीमा कोरेगाव येथे जमला. हातामध्ये निळे झेंडे आणि मुखी जयभीम जयभीमचा जयघोष अशा वातावरणात कोरेगावचा भीमा आजचा दिवस उत्साहात साजरा झाला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यशासनाच्यावतीने मानवंदना दिली. यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, आमदार बापूसाहेब पठारे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन पीपल पार्टीचे जोगेंद्र कावडे, बामसेफचे वामन मेश्राम, भीमराज आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, आदी विविध सामाजिक संघटनांचे नेते विजयस्तंभासमोर नतमस्तक झाले..
प्रशासनाने गेले दोन महिने सातत्याने गाव बैठका घेत सामाजिक सलोखा निर्माण केला होता.
देश विदेशातूनही मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी समाज विजयस्तंभाजवळ एकवटला होता.
छत्रपती संभाजीराजेंच्या समाधीस्थळाला अभिवादन -
विजयस्तंभास अभिवादन केल्यानंतर वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी लोटले होते. भीमा कोरेगाव ते वढू ब्रुद्रुक येथे जाऊन येण्यासाठी पीएमपीएल बसची व्यवस्था करण्यात आली होती.
महार रेजिमेंटची सलामी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९२७ साली विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आल्यानंतर त्यांनी महार रेजिमेंटची स्थापना करण्याची मागणी स्तंभावरूनच केली होती. या घटनेच्या कृतज्ञता म्हणून दरवर्षी १ जानेवारीला विजयस्तंभास महार रेजिमेंटच्या निवृत्त जवानांच्या वतीने मानवंदना दिली जाते.
शाहिरी जलशांचा उत्साह
या नागरिकांमध्ये उत्साह भरण्याचे काम जागोजागी शाहिरी जलशाच्या माध्यमातून केले जात होते. आंबेडकरी चळवळीची आणि सामाजिक विषमतेवर सडेतोड भाष्य करणारी गीतं याठिकाणी साजरी केली जात होती.