सुशीला आजींच्या नृत्यावर लाखो लाईक्सचा पाऊस, ऐंशीव्या वर्षात तरुणांना लाजवणारी अदाकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 04:29 PM2017-12-05T16:29:43+5:302017-12-05T17:12:14+5:30

पुणे : एकीकडे झिंगाटसारखं उडत्या चालीचं गाणं तर दुसरीकडे जा तोसे नहीं बोलूं कन्हैया सारखे लयबद्ध गीत....दोन्ही गाण्यांवर तेवढ्याच उत्साहाने नृत्य करणा-या पुण्याच्या सुशीला आज्जी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

Millions of Likes rain on Sushila grandmother's dancing, dazzling youth in the 80's | सुशीला आजींच्या नृत्यावर लाखो लाईक्सचा पाऊस, ऐंशीव्या वर्षात तरुणांना लाजवणारी अदाकारी

सुशीला आजींच्या नृत्यावर लाखो लाईक्सचा पाऊस, ऐंशीव्या वर्षात तरुणांना लाजवणारी अदाकारी

googlenewsNext

- प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : एकीकडे झिंगाटसारखं उडत्या चालीचं गाणं तर दुसरीकडे जा तोसे नहीं बोलूं कन्हैया सारखे लयबद्ध गीत....दोन्ही गाण्यांवर तेवढ्याच उत्साहाने नृत्य करणा-या पुण्याच्या सुशीला आज्जी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. ऐंशी वर्षांच्या या आजींच्या नृत्याच्या व्हिडीओला तीन दिवसांत १२ लाख व्ह्यूज मिळाले असून, हजारो शेअर तर लाखो लाईक्स आणि कमेंटसचा अक्षरश: पाऊस पडत आहे. 

सुशीला डावळकर असे या तरुण आजींचे नाव. जून महिन्यामध्ये ३ डीटी डान्स अ‍ॅकेडमीच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी सैराट चित्रपटातील झालंय झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर नृत्य केले आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यावेळच्या नृत्य परीक्षकांनी आजींना साक्षात दंडवत घातला. झिंगाट गाणे वा-याच्या वेगाने सोशल मीडियावर पसरले आणि आजींच्या कलेचे कौतुक करणा-या कमेंटचा पाऊस पडला. लाखो नेटिझन्सनी हा व्हिडीओ आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केला. दोन-तीन दिवसांपूर्वी आजींच्या नातवाने सहज त्यांना एखादे नृत्य करून दाखव ना, असा हट्ट धरला. आजींनी जा तोसे नहीं बोलूं कन्हैया या गाण्यावर अदाकारी पेश केली.

नातू संकेत डावळकर याने हा व्हिडीओ शेअर केल्यावर सशीला आजींची अदाकारी पाहून सर्वांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. आजी तरूणपणी चांगल्या नर्तकी असणार, कला कधी लपत नाही तसेच नष्टही होत नाही, फक्त मनुष्य जीवनातील चढउतारात जगणचं विसरून जातो, पण आजी खरंच मानना पडेगा, आताही वर्ग खोलून आपण नृत्य शिकवू शकता, तुमचे नृत्य पाहून आज्जी म्हणायलाही लाज वाटते कारण आम्ही तुमच्यापेक्षा वयाने कमी असूनही इतकी चपळता आमच्यात नाही. खरंच कलाकाराला वयाची मर्यादा नसते अशा लाखो कमेंटसमधून आजींवर कौतुकाचा वर्षाव झाला. 

आजींचा जन्म जेजुरीचा. त्यांना लहानपणापासून नृत्याची आवड होती. बालवाडीत असताना बार्इंनी डान्स करायला सांगितला की त्या एका पायावर तयार असायच्या. काही कारणाने आजी पहिली-दुसरी इयत्तेनंतर शाळा शिकू शकल्या नाहीत. त्यांचे आई-वडील आजी लहान असतानाच वारले. बहिणीने त्यांचा सांभाळ केला. आजींना चित्रपट पाहण्याची खूप आवड. एखादा चित्रपट पाहिला की त्यातील स्टेप्स त्यांना तोंडपाठ व्हायच्या. एखादे नृत्य आवडले की त्या तो चित्रपट दोन-तीनदा पहायच्या. एखादा लग्न समारंभ असो की गणेशोत्सव, आजींचा डान्स ठरलेला. 

लोकमतशी बोलताना सुशीला डावळकर म्हणाल्या, लग्न झाल्यावर नृत्याच्या आवडीला लगाम बसला. सासू-सासरे कडक शिस्तीचे असल्याने आवडीकडे दुर्लक्ष करून मी संसारात रमले. मुलगी आणि मुलाच्या संगोपनावर लक्ष केंद्रित केले. सासू-सास-यांच्या पश्चात मात्र पुन्हा एकदा नृत्याची आवड जोपासू लागले. त्या कोठेही नृत्य शिकल्या नाहीत, हे विशेष. ही आवड त्यांनी स्वत:पुरतीच मर्यादित ठेवली. सध्या आजी राजेंद्र डावळकर या आपल्या मुलाकडे राहतात. मुलगा, सून, दोन्ही नातू मला नेहमीच प्रोत्साहन देतात, असे आजी सांगतात.

सुशीला आजींचा नृत्याचा वारसा त्यांचा नातू संकेत डावळकर पुढे चालवत आहे. आजीचे कलागुण जोपासत त्याने नृत्यामध्ये करिअर करण्याचे ठरवले आहे. सिंबायोसिस महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने नृत्याचे व्यावसायिक प्रशिक्षण घेतले. आता याच क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी तो धडपडत असून, आजीच्या आशीर्वादाने मी नक्कीच या क्षेत्रात यशस्वी होईन, असा विश्वास त्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केला. 
-----------------
मला तंत्रज्ञानातील काही कळत नाही. मात्र, खूप लोकांनी माझ्या डान्सचा व्हिडीओ पाहून कौतुक केले आहे, हे नातवाने आणि मुलाने सांगितले. पूर्वीच्या काळी मुलींनी नृत्य करणे फारसे मान्य केले जात नव्हते. त्यामुळे नृत्याचे रितसर प्रशिक्षण घ्यावे, असे कधीच वाटले नाही. मुलगा, सून आणि नातवंडांकडून नृत्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. सध्याच्या तरुणांनी आवडीने या क्षेत्रातले शिक्षण घ्यावे, असे मला वाटते.

- सुशीला डावळकर

Web Title: Millions of Likes rain on Sushila grandmother's dancing, dazzling youth in the 80's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे