MHADA Lottery 2025: म्हाडाची ६१६८ घरांची सोडत, पुणे, पिंपरीत एकूण ३ हजार घरे; ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 17:25 IST2025-09-11T17:25:42+5:302025-09-11T17:25:55+5:30

Pune MHADA Lottery 2025 Application Starts Today: गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये काढण्यात आलेल्या सोडतीतील १ हजार ३०० शिल्लक राहिलेली घरेही या सोडतीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

MHADA's 6168 houses are being sold, a total of 3 thousand houses in Pune and Pimpri; | MHADA Lottery 2025: म्हाडाची ६१६८ घरांची सोडत, पुणे, पिंपरीत एकूण ३ हजार घरे; ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत

MHADA Lottery 2025: म्हाडाची ६१६८ घरांची सोडत, पुणे, पिंपरीत एकूण ३ हजार घरे; ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत

Pune MHADA Lottery 2025:पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने पुणे, पिंपरीसह सांगली व सोलापूर जिल्ह्यांत ६ हजार १६८ घरांची सोडत काढली आहे. यात पुणे व पिंपरी महापालिकेच्या हद्दीत प्रत्येकी सुमारे दीड हजार घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तर पीएमआरडीए क्षेत्रात अकराशेहून अधिक घरे असतील, अशी माहिती पुणे म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. अर्ज व अनामत रक्कम स्वीकृती गुरुवारपासून (दि. ११) सुरू झाली असून अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर असेल. कृत अर्जांची अंतिम यादी १७ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार असून २१ नोव्हेंबरला सोडत जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये काढण्यात आलेल्या सोडतीतील १ हजार ३०० शिल्लक राहिलेली घरेही या सोडतीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

म्हाडाच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत आढळराव यांनी ही माहिती दिली. यावेळी मुख्याधिकारी राहुल साकोरे, कार्यकारी अभियंता मनीषा मोरे, प्रकाश वाबळे, मिळकत व्यवस्थापक अतुल खोडे उपस्थित होते. म्हाडाच्या या सोडतीत एकूण ६ हजार १६८ घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील १ हजार ६८३ घरांचा समावेश आहे. तर म्हाडाच्या पंतप्रधान आवास योजनेतून २९९ घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तर १५ सामाजिक गृहनिर्माण व २० टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेतून पुणे महापालिका हद्दीतील १ हजार ५३८, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील १ हजार ५३४ तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील १ हजार ११४ घरे या सोडतीत नागरिकांसाठी ठेवण्यात आली आहेत.

अर्ज व अनामत रक्कम स्वीकृती गुरुवारपासून (दि. ११) सुरू झाली असून अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर असेल. स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी ११ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असून हरकती व दावे दाखल करण्याची अंतिम मुदत १३ नोव्हेंबर असेल. तर स्वीकृत अर्जांची अंतिम यादी १७ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार असून २१ नोव्हेंबरला सोडत जाहीर करण्यात येणार आहे. अर्ज करताना अधिवास प्रमाणपत्र २०१८ नंतर काढलेले आणि बारकोड असलेले बंधनकारक आहे. तर आधार आणि पॅन कार्ड डिजिलॉकर ॲपवरूनच स्वीकारले जाणार आहेत.

आढळराव म्हणाले, ‘गेल्या वर्षभरात पुणे म्हाडाची ही दुसरी सोडत आहे. अर्ज करताना उत्पन्नाचा दाखला आधीच्या वर्षाचा घेतला जातो. मात्र, कोकण म्हाडा विभागात दोन वर्षांचा उत्पन्नाचा दाखला घेतला जातो. पुणे म्हाडातही तसा घेतला जाईल का, याबाबत पाठपुरावा करू. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शहरातील म्हाडाच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात या इमारतीचा पुनर्विकास समूह पद्धतीने शक्य नसल्यास एकल पद्धतीने करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्याची अमंलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. येरवड्यातील वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत चर्चा झाली असून संरक्षण विभागाच्या परवानगी मिळविण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. याबाबत आणखी एका बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.’

या सोडतीत गेल्या सोडतीतील शिल्लक राहिलेल्या १ हजार ३०० घरांचा समावेश आहे. त्यात पुणे महापालिका हद्दीतील ५३१ घरांचा समावेश आहे. पीएमआरडीएतील २५० तर पिंपरी महापालिका हद्दीतील ४२३ घरांचा समावेश असल्याची माहिती साकोरे यांनी यावेळी दिली. दोन सोडतीत न विकली गेलेली घरे तिसऱ्या सोडतीत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर दिली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: MHADA's 6168 houses are being sold, a total of 3 thousand houses in Pune and Pimpri;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.