MHADA : ‘म्हाडा’च्या लाभार्थींना बँक कर्ज काढण्यासाठी अवधी मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 12:31 IST2026-04-07T12:28:27+5:302026-04-07T12:31:22+5:30
- बांधकाम व्यावसायिकांनी अडवणूक न करण्याच्या सूचना - पुणे म्हाडा मंडळाअंतर्गत सप्टेंबर महिन्यात ४ हजार १८६ घरांसाठी सोडत काढण्यात आली.

MHADA : ‘म्हाडा’च्या लाभार्थींना बँक कर्ज काढण्यासाठी अवधी मिळणार
पुणे : ‘म्हाडा’च्या सोडतीतील पात्र लाभार्थ्यांना ठराविक वेळेत दस्त नोंदणीसाठी अडवणूक करू नये, अशा सक्त सूचना ‘म्हाडा’चे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी बांधकाम व्यावसायिकांना दिल्या आहेत. त्यानुसार लाभार्थींनी बँक कर्ज काढण्यासाठी कालावधी उपलब्ध करून दिला आहे. परिणामी पात्र लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. पुणे म्हाडा मंडळाअंतर्गत सप्टेंबर महिन्यात ४ हजार १८६ घरांसाठी सोडत काढण्यात आली.
यामध्ये खासगी बांधकाम व्यावसायिकांकडून २० टक्के सर्व सर्वसमावेशक योजनेअंतर्गत सदनिकांचा समावेश असून, या सोडतीचा निकाल दि. १० फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर म्हाडाने लाभार्थी आणि प्रतीक्षा यादीतील पात्र अर्जदारांची नावे ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आली आहेत. पात्र लाभार्थ्यांना देकार पत्र देऊन पुढील रक्कम भरण्यासाठी दि. ५ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
मात्र, अनेक अर्जदारांचे आर्थिक नियोजन (बँक कर्ज) सुरू आहे. याबाबत ठराविक कालावधीत दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी काही बांधकाम व्यावसायिकांकडून पात्र लाभार्थ्यांची अडवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून मुदतीच्या आत दस्त नोंदणी केली नाही, तर सदनिकेचा ताबा मिळणार नाही, असे सांगितले जात आहे.
या पार्श्वभूमीवर अनेक अर्जदारांनी ‘म्हाडा’कडे तक्रारी केल्या आहेत. याची दखल घेत २० टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत सदनिका उपलब्ध करून देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना पत्र पाठवून अडवणूक करू नये अशा सूचना ‘म्हाडा’तर्फे देण्यात आल्या आहेत. याबाबत म्हाडा कार्यालयातील अभियंत्यांच्या पातळीवर निर्णयही घेण्यात येत आहे, अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना बँकांकडून कर्ज उपलब्ध करण्यासाठी कालावधी उपलब्ध झाला असून तातडीने पुढील प्रक्रिया करावी, असे आवाहन विजेत्यांना करण्यात आले आहे.
सोडतीतील लाभार्थ्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत बँक कर्ज काढण्यासाठी कालावधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तोपर्यंत बांधकाम व्यावसायिकांनी नागरिकांची अडवणूक करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. - राहुल साकोरे, मुख्याधिकारी, ‘म्हाडा’, पुणे