पुण्यात म्हाडाच्या ४ हजार घरांची सोडत पूर्ण; अडीच लाख अर्जांत काहींना आनंद, काहींना निराशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 13:10 IST2026-02-11T13:01:14+5:302026-02-11T13:10:14+5:30
यावेळी उपस्थित नंबर लागलेल्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला, तर अनेकांना स्वप्नाचे घर न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत परत जावे लागले.

पुण्यात म्हाडाच्या ४ हजार घरांची सोडत पूर्ण; अडीच लाख अर्जांत काहींना आनंद, काहींना निराशा
पुणे : राज्यातील नगर परिषदा, महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीमुळे रखडलेली म्हाडाच्या सदनिकांची सोडत बुधवारी पूर्ण करण्यात आली असून अनेकांना आपल्या स्वप्नाचे घर लॉटरी पद्धतीने घराचा नंबर लागला.
यावेळी उपस्थित नंबर लागलेल्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला, तर अनेकांना स्वप्नाचे घर न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत परत जावे लागले. यावेळी म्हाडातर्फे घर लागलेल्या नागरिकांचे अभिनंदन व स्वागत करण्यात आले. ही सोडत पुणे जिल्हा परिषद येथील शरदचंद्र पवार सभागृहात पार पडली. यावेळी सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.
म्हाडातर्फे पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील घरांसाठी ११ सप्टेंबर २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीत एकूण ४,१८६ सदनिकांचा समावेश होता. त्यापैकी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र तसेच पीएमआरडीएअंतर्गत २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील ३३२२ सदनिका आणि १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील ८६४ सदनिका सोडतीसाठी उपलब्ध आहेत.
अर्जदारांच्या मागणीनुसार, तांत्रिक अडचणी आणि निवडणूक आचारसंहितेमुळे अर्ज भरण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. यानंतरही सोडतीसाठी मोठा प्रतिसाद मिळाला असून, एकूण 2,58,832 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 2,15,965 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली असून, त्यांचा सोडतीत समावेश करण्यात आला आहे. सोडतीचा ऑनलाइन कार्यक्रम शरदचंद्र पवार सभागृह, पुणे जिल्हा परिषद येथे बुधवारी पार पडला. यावेळी म्हाडाचे सभापती शिवाजी आढळराव पाटील आणि म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) हे दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) सहभागी होणार आहेत.