बुधवार पेठेत मेफेड्रोन विक्री करणारा गजाआड; तब्बल एक लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 11:57 IST2025-07-07T11:56:35+5:302025-07-07T11:57:56+5:30
पंधरा दिवसांपूर्वी बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत मेफेड्रोनची विक्री केल्याप्रकरणी एका कुंटणखाना मालकिणीसह तिच्या भावाला अमली पदार्थविरोधी पथकाकडून अटक करण्यात आली होती

बुधवार पेठेत मेफेड्रोन विक्री करणारा गजाआड; तब्बल एक लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : मेफेड्रोन बाळगणाऱ्या मुंबईतील एकाला फरासखाना पोलिसांनीअटक केली. त्याच्याकडून दोन ग्रॅम मेफेड्रोन, मोबाइल आणि रोकड असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संदीप सुकनराज जैन (४२, रा. भुलेश्वर, मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंध कायद्यान्वये फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बुधवारपेठेत पोलिसांचे पथक शनिवारी (दि. ५) दुपारी गस्त घालत होते. त्यावेळी परिसरातील एका पान टपरीजवळ जैन थांबला होता. त्याच्याकडे मेफेड्रोन असल्याची माहिती पोलिस कर्मचारी प्रशांत पालांडे यांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने सापळा लावून जैन याला पकडले. त्याच्याकडून दोन ग्रॅम २४ मिलिग्रॅम मेफेड्रोन, मोबाइल तसेच ५ हजार ६२० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मेफेड्राेनची किंमत ४५ हजार रुपये आहे. जैन याने मेफेड्रोन कोठून आणले, तसेच कोणाला विक्री करणार होता, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
जैन याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत मेफेड्रोनची विक्री केल्याप्रकरणी एका कुंटणखाना मालकिणीसह तिच्या भावाला अमली पदार्थविरोधी पथकाकडून अटक करण्यात आली होती. कुंटणखाना मालकीण आणि तिचा भाऊ हे वेश्यावस्तीत येणाऱ्या ग्राहकांना, तसेच महिलांना मेफेड्रोन विक्री करत असल्याची माहिती तपासात मिळाली होती.