राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या नेत्यांच्या भेटीगाठी; जाचक पिता-पुत्रांनी घेतली शरद पवारांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 05:02 PM2024-02-17T17:02:59+5:302024-02-17T17:03:44+5:30

शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेरजेचे राजकारण करण्यास सुरुवात केल्याचे संकेत या भेटीद्वारे मिळत आहेत...

Meetings of leaders estranged from NCP; Sharad Pawar was met by oppressive father and sons | राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या नेत्यांच्या भेटीगाठी; जाचक पिता-पुत्रांनी घेतली शरद पवारांची भेट

राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या नेत्यांच्या भेटीगाठी; जाचक पिता-पुत्रांनी घेतली शरद पवारांची भेट

बारामती (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसपासून दुरावलेले राज्य साखर संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी त्यांचे पुत्र कुणाल जाचक यांच्यासमवेत गोविंदबाग निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे इंदापूर तालुक्यात नवीन राजकीय समीकरणे उदयाला येण्याची चिन्हे आहेत. शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेरजेचे राजकारण करण्यास सुरुवात केल्याचे संकेत या भेटीद्वारे मिळत आहेत.

बारामतीच्या राजकारणात पवार कुटुंबासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राजकीय गणित मोठ्या प्रमाणात बदलले आहे. गेल्या ५५ वर्षांच्या राजकारणात पवार कुटुंबात मनोभेद झाल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शरद पवार आता स्वत: आखाड्यात उतरले आहेत. लोकसभा मतदारसंघावर पकड मजबूत करण्यासाठी आवश्यक गणित जुळविण्याचा पवार यांचा प्रयत्न आहे.

पृथ्वीराज जाचक हे सहकार क्षेत्रातील अभ्यासू नेते मानले जातात. सुमारे २० वर्षांपूर्वी जाचक शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापासून दुरावले होते. जाचक यांचे वडील कै. साहेबराव जाचक छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन होते. त्यामुळे कारखान्याबरोबर जाचक यांचे भावनिक नाते आहे. २००३ मध्ये कारखान्याच्या सुवर्ण महोत्सवी गळीत हंंगामाच्या काळात डावलले जात असल्याच्या भावनेतून पृथ्वीराज जाचक यांनी शरद पवार यांच्यापासून फारकत घेतली होती. त्यानंतर जाचक यांनी भाजपमधून त्यावेळी थेट शरद पवार यांच्याविरोधात २००४ मध्ये लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यानंतर जाचक हे राष्ट्रवादीपासून अंतर ठेवून होते. त्यानंतर शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून ऊसदरासह, महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांनी कायम आक्रमक भूमिका ठेवली.

ऑगस्ट २०२० मध्ये ‘डिनर डिप्लोमसी’

ऑगस्ट २०२० मध्ये मुंबईत ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी मुंबईत शरद पवार आणि पृथ्वीराज जाचक यांच्यात ‘डिनर डिप्लोमसी’ झाल्याचे पाहायला मिळाले. २०२० मध्ये शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी बेरजेचे राजकारण करण्यासाठी हात पुढे केला. उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी चर्चेनंतर २०२० च्या गळीत हंगामापासून छत्रपती कारखान्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयात, कारभारात जाचक यांनी लक्ष घातले. मात्र, ऑक्टोबर २०२१ मध्ये संचालक मंडळ आणि जाचक यांच्यात वाद झाला. या कारखान्यात अजित पवार यांचा शब्द अंतिम मानला जातो. त्यामुळे संचालक मंडळाबरोबर मतभेद झाल्यानंतर २०२१ मध्ये पुन्हा जाचक राष्ट्रवादीपासून, म्हणजेच अजित पवार यांच्यापासून दूर झाले. मात्र, राष्ट्रवादीतील फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी बेरजेचे राजकारण करण्यास सुरुवात केल्याचे संकेत आहेत. त्यामुळे शनिवारी (दि. १७) जाचक पिता-पुत्रांनी पुन्हा शरद पवार यांची घेतलेली भेट इंदापूर तालुक्याच्या राजकारणासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

Web Title: Meetings of leaders estranged from NCP; Sharad Pawar was met by oppressive father and sons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.