वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 10:27 IST2025-04-18T10:26:39+5:302025-04-18T10:27:40+5:30
डॉक्टर, रुग्णालय दोषी आहेत की नाही याबाबत पोलिसांना काहीच बोध होत नसल्याने पुणे पोलिसांकडून ससूनकडे अभिप्राय मागितला जाणार

वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही
पुणे : गर्भवती तनिषा भिसे या महिलेच्या मृत्यूप्रकरणी ससून रुग्णालयाच्या समितीने पुणेपोलिसांना चौकशी अहवाल सादर केला. या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर कोणताही ठपका ठेवण्यात आला नसल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून समोर आली आहे. या अहवालातून रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टर यांच्याकडून काय चूक झाली? त्यांच्यावर काय कारवाई करावी? यासंदर्भात कोणतीही स्पष्टोक्ती नसल्याने नेमकी काय कारवाई करावी? असा संभ्रम पोलिसांना आहे. ससूनने सादर केलेल्या अहवालावर पोलिसांनी ४ मुद्दे उपस्थित केले असून, त्या मुद्द्यांवर ससूनचा अभिप्राय मागवला आहे.
ससून रुग्णालयाच्या समितीने सादर केलेला अहवाल गुरुवारी (दि. १७) पोलिसांना मिळाला. ६ पानी असलेला अहवालात इंग्रजी आणि मराठी भाषेत आहे. या अहवालात इंदिरा आयव्हीएफ, सूर्या हॉस्पिटल आणि मणिपाल हॉस्पिटलवर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली. इंदिरा आयव्हीएफ ने स्त्री बीजांड नसताना आयव्हीएफ केले, सूर्या हॉस्पिटलकडे योग्य त्या सोयी-सुविधा नसताना तनिषा भिसे यांना दाखल करून घेतले तर मणिपाल रुग्णालयाने भिसे यांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन केले नाही असा ठपका मात्र अहवालात ठेवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुणे पोलिस नव्याने ४ मुद्द्यांवर मागवणार अभिप्राय..
गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात ससून रुग्णालयाच्या समितीने पाठवलेल्या अहवालात स्पष्टता नसल्याने, तसेच संबंधित अहवालात महिलेच्या उपचारावेळी वैद्यकीय हयगय झाली, डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला, असे कुठेही नमूद नाही. त्यामुळे डॉक्टर, रुग्णालय दोषी आहेत की नाही याबाबत पोलिसांना काहीच बोध होत नाहीये. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून आता चार मुद्दे उपस्थित करुन पुन्हा ससून रुग्णालयाच्या समितीकडे त्याचा अभिप्राय मागितला जाणार आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नेमका गुन्हा दाखल होईल की नाही, दोषी कोण आहे, हे ठरवता येणे शक्य असल्याची माहिती पुणे पोलिस दलातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.