महिलेच्या मृत्यू प्रकरणात वैद्यकीय निष्काळजीपणा; १७ वर्षांच्या लढ्यानंतर पतीला २० लाखांची नुकसानभरपाई मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 15:01 IST2025-11-22T15:01:04+5:302025-11-22T15:01:55+5:30
प्रसूतीच्या काळात टाके घालताना मोठा टॉवेल शरीरात राहिल्याने तो पुन्हा काढून टाके घालण्यात आले, या दरम्यान महिलेचा मृत्यू झाला

महिलेच्या मृत्यू प्रकरणात वैद्यकीय निष्काळजीपणा; १७ वर्षांच्या लढ्यानंतर पतीला २० लाखांची नुकसानभरपाई मिळणार
पुणे: महिलेच्या मृत्यूसाठी वैद्यकीय निष्काळजीपणा व सदोष सेवेचा ठपका ठेवत राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या पुणे खंडपीठाने जीवनदीप मेडिकेअर सेंटर आणि डॉ. दीपलक्ष्मी रगडे यांना दोषी धरून कुटुंबाच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. मयत महिलेच्या पतीला आयोगाने २० लाख रुपये नुकसानभरपाई २२ ऑक्टोबर २००८ पासून सहा टक्के व्याजाने, उपचारांसाठी ६ लाख रुपये आणि तक्रार खर्च म्हणून ५० हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. हा निकाल सदस्य मिलिंद सोनवणे आणि नागेश कुंबरे यांच्या खंडपीठाने गुरुवारी (दि.२०) दिला.
यातील विशेष बाब म्हणजे, १७ वर्षांहून अधिक काळ या केसची सुनावणी चालली. सुरुवातीला काही ना काही कारणाने सुनावणी लांबली. त्यानंतर केस पुणे खंडपीठाकडे वर्ग झाली. त्यानंतर कोरोना काळातील न्यायालयीन कामकाजातील खंड, पुणे खंडपीठाचे व्यवस्थित सुरू न झालेले काम, या सर्व अडथळ्यांवर मात करत प्रशांत कुकडे आणि त्यांचे वकील ॲड. ज्ञानराज संत यांनी सातत्याने लढा दिला आणि अखेर न्याय मिळवला.
प्रकरण काय?
८ ऑगस्ट २००८ रोजी रूपाली कुकडे यांना प्रसूतीसाठी पाषाण सूस रोड येथील जीवनदीप मेडिकेअर सेंटर येथे डॉ. दीपलक्ष्मी रगडे यांच्याकडे उपचारांतर्गत दाखल केले होते. लेबर पेन सुरू झाल्यानंतर त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले; मात्र तब्बल तीन तास त्या बाहेर आल्या नाहीत. या काळात टाके घालताना मोठा टॉवेल शरीरात राहिल्याने तो पुन्हा काढून टाके घालण्यात आले, अशी माहिती नंतर नातेवाईकांना कळाली. पाठीच्या कण्यातून दिलेली भूल अपुरी पडल्याने त्यांना पूर्ण भूल देण्यात आली. याचदरम्यान त्यांना कार्डियाक अरेस्ट आला. उपचारानंतरही योग्य देखरेख न मिळाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. त्यांना रत्ना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले; मात्र डिस्चार्ज कार्ड आणि आवश्यक कागदपत्रे डॉक्टरांनी वेळेवर दिली नसल्याचेही नमूद आहे. नंतर रूपाली यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्या कोमामध्ये गेल्या आणि अखेर १ मे २०११ रोजी त्यांचे निधन झाले. प्रशांत कुकडे यांनी पोलिस तक्रारीसोबत २० ऑक्टोबर २००८ रोजी राज्य ग्राहक आयोगातही दाद मागितली. ससून रुग्णालयाच्या तज्ज्ञ समितीनेही जीवनदीप मेडिकेअर सेंटर आणि डॉ. रगडे यांच्या निष्काळजीपणाला पुष्टी दिली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, वैद्यकीय अहवाल आणि पुराव्यांचा बारकाईने अभ्यास करून राज्य आयोगाने कुकडे कुटुंबाला न्याय देत हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
उशिरा का होईना, परंतु मृत महिलेला न्याय मिळाला आहे. पावणेतीन वर्षांपेक्षाही जास्त काळ कोमामध्ये असताना घरातील सर्वांना झालेला मानसिक व शारीरिक त्रास तसेच रूपाली कुकडे यांच्या निधनानंतर झालेला त्रास हा कोणत्याही रकमेने भरून येणारा नाही. मात्र, वैद्यकीय निष्काळजीपणा व सदोष सेवा देऊन त्या जबाबदारीतून पळ काढता येणार नाही, हेच या निकालाने सिद्ध झाले आहे व त्यामुळे राज्य आयोगाच्या पुणे खंडपीठाच्या या निकालाचे स्वागत आहे. - ॲड. ज्ञानराज संत, पतीचे वकील