Pune Police: मृणाल शेवाळेसह त्याच्या साथीदारांविरोधात मोक्का, पुणे पोलिसांची कारवाई
By नितीश गोवंडे | Published: October 2, 2023 02:13 PM2023-10-02T14:13:20+5:302023-10-02T14:14:30+5:30
सनीने संघटित गुन्हेगारी करण्यासाठी टोळी बनवून स्वत:च्या व टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी गुन्हे केले आहेत...
पुणे : उरळी देवाची गावात तलवारीचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या तसेच लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या सनी उर्फ मृणाल मोहन शेवाळे आणि त्याच्या २ साथीदारांविरोधात पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली.
२६ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास फिर्यादी उरळी देवाची या गावातील स्माशानभूमीजवळ असलेल्या ओढ्याजवळ पाईपलाईन दुरूस्तीचे काम करत होते. त्यावेळी सनी उर्फ मृणाल शेवाळे याने त्यांना तलवारीचा धाक दाखवत काम सुरू ठेवण्यासाठी ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. तसेच त्याचे साथीदार प्रसाद भाडळे आणि समीर जमादार यांनी फिर्यादीला लाकडी दांडक्याने फिर्यादीला मारहाण केली. यावेळी शेवाळेने ५० हजार दिले नाही तर मारून टाकण्याची धमकी देत हातातील तलवार हवेत फिरवत ‘आम्ही इथले भाई आहोत, कुणी मध्ये आले तर जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत दहशत निर्माण केली. याप्रकरानंतर शेवाळे आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान टोळी प्रमुख सनी उर्फ मृणाल मोहन शेवाळे (२६, रा. उरळी देवाची), प्रसाद बापुसाहेब भाडळे (२३, रा. उरळी देवाची) आणि समीर बाबुलाल जमादार (२३, रा. मंतरवाडी) यांना अटक केली होती. सनीने संघटित गुन्हेगारी करण्यासाठी टोळी बनवून स्वत:च्या व टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी गुन्हे केले आहेत.
मागील १० वर्षांमध्ये त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमवून खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, बेकायदेशिररीत्या हत्यार बाळगून दुखापत करणे, प्राणघातक हल्ला करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींवर लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी परिमंडळ ५ चे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यामार्फत पूर्व विभागाचे अपर पोलिस आयुक्त प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांच्याकडे मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला होता, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.