राज्यात पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू; आरोपी पळण्याच्या घटनेत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 15:01 IST2017-12-02T14:57:34+5:302017-12-02T15:01:38+5:30
महाराष्ट्रात पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होत असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालात दिसून येत आहे़. तर आरोपी पळून जाण्याच्या घटनेमध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे़.

राज्यात पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू; आरोपी पळण्याच्या घटनेत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर
पुणे : पोलिसांच्या मारहाणीत सांगली येथील अनिकेत कोथळे याची हत्या प्रकरण ताजे असताना महाराष्ट्रात पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होत असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालात दिसून येत आहे़ त्याचबरोबर पोलिसांच्या ताब्यात आरोपी पळून जाण्याच्या घटनेमध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे़
२०१६ मध्ये देशभरात पोलीस कोठडीतील मृत्यूच्या ६० घटना घडल्या़ त्यात एकट्या महाराष्ट्रात १२ घटना झाल्या होत्या़ त्या खालोखाल गुजरातमध्ये ९, मध्यप्रदेशमध्ये ५ पोलीस कोठडीत मृत्यू झाले होते़ महाराष्ट्रातील १२ घटनांपैकी ८ घटनांमध्ये आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे़
आरोपीला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात नेताना अथवा पोलीस कोठडीत ठेवले असताना पळून जाण्याच्या घटनांमध्ये देशात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो़ सर्वाधिक आरोपी पळून जाण्याचे प्रमाण उत्तर प्रदेशमध्ये असून तेथे २८२ घटनांमध्ये ३२७ आरोपी पळून गेले होते़ त्यापाठोपाठ मध्य प्रदेशमध्ये १११ घटनांमध्ये १३३ आरोपी पळाले होते़ त्यानंतर महाराष्ट्रात ९८ घटनांमध्ये ११८ आरोपी पळून गेले होते़ यामध्ये २१ आरोपी पोलीस लॉकअॅपमधून पळून गेले होते तर त्याव्यतिरिक्त ९७ आरोपी इतर ठिकाणाहून पळून गेले होते़ लॉकअॅपमधून पळून गेलेल्या सर्वांना पकडण्यात पोलिसांना यश आले तर, इतरांपैकी ७३ जणांना परत अटक करण्यात पोलीस यशस्वी झाले होते़