पुणे: गाव नकाशातील सर्व गाव रस्ते, पाणंद रस्त्यांचे होणार मजबुतीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 14:13 IST2021-11-24T14:11:14+5:302021-11-24T14:13:58+5:30
राज्यात आतापर्यंत पालकमंत्री पाणंद रस्ते योजाना राबविण्यात येत होती. परंतु यासाठी स्वतंत्र निधी मात्र उपलब्ध करून दिला जात नव्हता...

पुणे: गाव नकाशातील सर्व गाव रस्ते, पाणंद रस्त्यांचे होणार मजबुतीकरण
सुषमा नेहरकर- शिंदे
पुणे: राज्य शासनाच्या मातोश्री ग्रामसमृधी पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यातील गाव नकाशातील सर्व गाव रस्ते, शेती व पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. यासाठी प्रथमच राज्य शासनाने केंद्र व राज्याच्या नरेगा योजनेतून भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राज्यात आतापर्यंत पालकमंत्री पाणंद रस्ते योजाना राबविण्यात येत होती. परंतु यासाठी स्वतंत्र निधी मात्र उपलब्ध करून दिला जात नव्हता. यामुळेच महसूल विभागाकडून असे गाव, शेती, पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करून तात्पुरता मुरूम-माती टाकून रस्ते तयार करण्यात आले. परंतु यातील बहुतेक रस्त्यांवर अतिक्रमण झाले व रस्ते नादुरुस्त देखील झाले. यामुळेच शासनाने आता मातोश्री ग्रामसमृधी पाणंद रस्ते योजना आली आहे. यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व तालुकास्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करण्यात आली आहे. या समिती मार्फत कामाचे डिएसआर (दर निश्चित) करणे, डिझेल दल निश्चित करण्याचे काम केले जाणार आहे.
याशिवाय यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. ग्रामसभेत गाव नकाशातील गाव, शेती व पाणंद रस्त्यांची नोंद घेणे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागा मार्फत रस्त्यांचे आराखडे तयार करणे, तहसिलदारांनी अतिक्रमणे काढून टाकणे याची जबाबदारी व कालावधी निश्चित केला आहे.
- प्रत्येक गावातील गाव, शेती व पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण होणार
- प्रत्येक शेताला पाय, गाडी मार्ग तयार करण्याचे उद्दिष्ट
- एकदा केलेला रस्ता पाच वर्षे पुन्हा करण्याची वेळ येऊ नये
- सरकारी पैशाने मोजणीचे काम करणार
प्रत्येक शेतक-यांच्या शेताला रस्ता-
शासनाच्या मातोश्री ग्रामसमृधी पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांमधील गाव नकाशावरील शेती, पाणंद, गाव रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. यामुळे सर्व शेतक-यांच्या शेतीला रस्ता मिळणार असून, शेतक-यांच्या विकासासाठी याचा चांगला उपयोग होईल.
- डाॅ.वनश्री लाभशेष्टीवार, उपजिल्हाधिकारी