मुंबई: भाजप पदाधिकाऱ्याविरुद्ध विनयभंगाच्या गुन्ह्याची तक्रार देणाऱ्या पुण्याच्या महिला वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बदली महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) रद्द केली. गत २३ जून रोजी महिला वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणवेशात असताना भाजपचे पुणे शहर महासचिव प्रमोद कोंधारे यांनी विनयभंग केला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसली. अस्वस्थ निरीक्षकांनी धैर्याने फारसखाना पोलिस ठाण्यात कोंधारे विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवला. कोंधारेवर यापूर्वी विनयभंग, खंडणी, मारहाण, दंगलसह ४ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी कोंढारेला अद्यापही अटक केलेली नाही.
गुन्हा दाखल केल्याने आरोपी किंवा इतर त्रास देतील, म्हणून स्वेच्छेने बदली घेण्याचा वरिष्ठांचा प्रस्ताव निरीक्षकांनी ठामपणे नाकारला. गुन्हा दाखल करण्याचा निर्णय स्वतःसाठी नव्हे, तर संपूर्ण महिला पोलिसांच्या सन्मानासाठी घेतला होता. बदलीने महिला पोलिसांचे मनोबल खच्ची होईल, असे त्यांनी कळवले. तथापि २१ जुलैला त्यांची वाहतूक विभागात बदली केली.
सरकारी वकिलांकडून युक्तिवाददरम्यान, गणेशोत्सवाच्या गर्दीत गैरसोयी टाळण्यासाठी प्रशासकीय कारणांनी बदली करण्यात आली. बदलीचा विनयभंगाच्या गुन्ह्याशी संबंध नसल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी मॅट मध्ये केला. त्याच्या विरुद्धच्या कसुरी अहवालामुळे बदली मंडळाने निर्णय घेतल्याचे सांगितले.
मॅटचे निरीक्षण काय ? १९ जुलै २०२५ रोजीच्या कसुरी अहवालात २१ जुलै २०२५ चा उल्लेख आहे यावरून तो मागाहून तयार केलेला आहे. एकाच दिवशी अहवाल, बदली मंडळाची बैठक व बदलीचे आदेश म्हणजे अनावश्यक घाई आहे. बदली प्रशासकीय नसून दंडात्मक आणि द्वेषपूर्ण आहे.