गंगाधाम फेज दोनमध्ये मध्यरात्री भीषण आग; अग्निशमन दलाकडून ५ जणांची सुटका

By विवेक भुसे | Published: March 2, 2024 12:52 PM2024-03-02T12:52:20+5:302024-03-02T12:53:50+5:30

अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीत घरामधील सर्व साहित्य जळून खाक झाले....

Massive midnight fire in Gangadham Phase II; Rescue of 5 people by fire brigade | गंगाधाम फेज दोनमध्ये मध्यरात्री भीषण आग; अग्निशमन दलाकडून ५ जणांची सुटका

गंगाधाम फेज दोनमध्ये मध्यरात्री भीषण आग; अग्निशमन दलाकडून ५ जणांची सुटका

पुणे : गंगाधाम फेज दोनमध्ये मध्यरात्री भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग लागलेल्या घरातील बाल्कनीत अडकलेल्या ५ जणांची सुखरुप सुटका केली. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीत घरामधील सर्व साहित्य जळून खाक झाले.

मार्केटयार्ड परिसरातील गंगाधाम फेज २ मधील विंग जी ५ या सात मजली इमारतीतील सातव्या मजल्यावरील घरात मध्यरात्री पावणे दोन वाजता आग लागल्याची वर्दी अग्निमन दलाला मिळाली. तातडीने गंगाधाम, कोंढवा खुर्द व मुख्यालयातून तीन फायरगाड्या व एक वॉटर टँकर अशी ६ वाहने घटनास्थळी पोहचली. 

सातव्या मजल्यावर चार खोल्या असलेल्या फ्लॅटमध्ये आग लागली असून मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाल्याचे दिसून आले. जवानांनी तातडीने वर धाव घेत होज पाईपच्या सहाय्याने पाण्याचा मारा सुरु करीत आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला. त्याचवेळी बाल्कनीमध्ये कुटुंबातील पाच जण अडकून पडल्याचे दिसून आले. त्यामध्ये एक ज्येष्ठ महिला, एक दांपत्य व त्यांची दोन लहान मुले या सर्वांना सुखरुप खाली आणण्यात आले. सुमारे तीस मिनिटाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

या फ्लॅटमधील पुढच्या खोलीमध्ये असलेल्या पेटत्या दिव्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घरातील सर्व गृहोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. इतकी मोठी सोसायटी असतानाही तेथील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे अग्निशमन दलाच्या निदर्शनास आले. अग्निशमन दलाचे अधिकारी संजय रामटेके, प्रभारी अधिकारी कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली २०जवानांनी यात सहभाग घेतला होता.

Web Title: Massive midnight fire in Gangadham Phase II; Rescue of 5 people by fire brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.