सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने स्वत:ला संपविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 16:57 IST2018-03-26T16:17:16+5:302018-03-26T16:57:55+5:30
पतीवर कर्ज झाल्यामुळे मोरे कुटूंबीय माया यांना माहेरहून पन्नास हजार रुपये आणावे अशी सतत मागणी करण्यात येत होती.

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने स्वत:ला संपविले
लोणी काळभोर : पतीने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी माहेरकडून ५० हजार रुपये आणावेत याकरीता सासरी होणारा शारीरिक व मानसिक छळ असह्य झाल्यामुळे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना कोरेगावमुळ ( ता. हवेली ) येथे घडली.याप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीसह सासू व दिर या तिघांना अटक केली आहे. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी प्रकाश सोपान बेलुसे (वय २८) यांनी फिर्याद दिली आहे.
माया शरद मोरे (वय.२५ रा.कोरेगाव मूळ ता.हवेली ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे भाऊ बेलुसे( वय २८, रा. पाटस, पळसे पुर्नवसन, ता. दौंड, ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माया हिचे पती शरद भिवा मोरे (वय.३० ), दिर भरत भिवा मोरे ( वय ३३ ) व सासू श्रीमती जनाबाई भिवा मोरे (वय.६०, तिघे रा.दासवे वस्ती, कोरेगांवमुळ, ता. हवेली ) या तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दासवे वस्तीवर माया शरद मोरे ही आपल्या पती शरद भिवा मोरे ,सासू ,सासरे आणि दिरासह सहकुटूंब राहत होती. माया व शरद मोरे यांचा विवाह ३० मे २०१२ रोजी झाला. शरद हा जमीन खरेदी - विक्री करतो. तर त्याचा मोठा भाऊ भरत याचे कपड्यांचे दुकान आहे. लग्नानंतर एक वर्षांनी शरद व माया यांना मुलगी झाली. आॅगस्ट २०१० मध्ये माया हिने आपला भाऊ प्रकाश यांस फोन केला व पती शरद याच्यावर खूप कर्ज झाले असून ते फेडण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये आण असे पती, सासू, दिर व जाऊ सांगत तिला शिवीगाळ मारहाण करून शारिरीक व मानसिक छळ करत होते. तिने सांगण्याचा खूप प्रयत्न केला परंतू त्यांनी ऐकले नाही. तिचा छळ चालूच राहिल्याने तिने भावाशी संपर्क साधला व जगणे असह्य झाले असल्याचे सांगितले. भावाने तिला असा विचार करू नकोस असे सांगितले. २३ मार्च रोजी तिने पुन्हा माहेरी संपर्क साधला व पैश्याच्या कारणांमुळे त्रास होत असल्याचे सांगितले. त्यावेळीही तिला समजावून सांगितले. अखेर तिला होणारा शारिरीक व मानसिक छळ असह्य झालेने २४ मार्च रोजी दुपारी आपल्या राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरी अडकवून गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटनेचा तपास उरुळी कांचन दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांच्यासह सचिन पवार, सोमनाथ चित्तारे, शशिकांत पवार हे करत आहे