मराठमोळा कला दिग्दर्शक राजू साप्ते आत्महत्येप्रकरणी बिझनेस पार्टनरला मुंबईतून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 12:46 PM2021-07-04T12:46:29+5:302021-07-04T12:46:47+5:30

बॉलीवूडमधील कामगार नेत्यांच्या खंडणीखोरीचा ठरला बळी

Marathmola art director Raju Sapte's business partner arrested from Mumbai in suicide case | मराठमोळा कला दिग्दर्शक राजू साप्ते आत्महत्येप्रकरणी बिझनेस पार्टनरला मुंबईतून अटक

मराठमोळा कला दिग्दर्शक राजू साप्ते आत्महत्येप्रकरणी बिझनेस पार्टनरला मुंबईतून अटक

Next
ठळक मुद्दे पार्टनरने व्यावसायिक नुकसान करण्याच्या धमक्या देऊन वारंवार जबरदस्तीने १० लाख रुपयांची मागणी केली

पुणे : मराठमोळा कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांनी आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ शेअर करीत गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून एकाला मुंबईतूनअटक केली आहे.

चंदन रामकृष्ण ठाकरे (वय ३६, रा. जीवनज्योती सोसायटी, कांदिवली वेस्ट, मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तसेच नरेश विश्वकर्मा (मिस्त्री), गंगेश्वर श्रीवास्तव (संजूभाई), राकेश मौर्य, अशोक दुबे (सर्व रा. मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांची पत्नी सोनाली राजेश साप्ते (वय ४५, रा. चारकोप, कांदिवली वेस्ट, मुंबई) यांनी वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या सर्वांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

बॉलीवूडमधील कामगार नेत्यांच्या खंडणीखोरीचा राजेश साप्ते हे बळी असल्याचे सांगितले जात आहे. साप्ते कुटुंबीय  हे मुंबईस वास्तव्यास आहे. त्यांचे ताथवडे येथील अशोकनगरमधील द नुक सोसायटीत फ्लॅट आहे. राजेश साप्ते हे शुक्रवारी एकटेच पुण्यात आले. त्यांनी आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ शेअर केला. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तो होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांच्या पत्नीने पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने त्यांच्या घरी धाव घेतली. तेव्हा साप्ते यांनी घरात गळफास घेतल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी  त्यांना रुग्णालयात नेले, परंतु, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे सांगितले.

आरोपी नरेश विश्वकर्मा, गंगेश्वर श्रीवास्तव, राकेश मौर्य व अशोक दुबे यांनी कट करुन राजेश साप्ते यांना जीवे मारण्याची धमकी दिली़. कामगारांना कामावर येऊ देणार नाही. तसेच व्यावसायिक नुकसान करण्याच्या धमक्या देऊन वारंवार जबरदस्तीने १० लाख रुपयांची मागणी केली. तसेच प्रत्येक प्रोजेक्टमध्ये १ लाख रुपयांची पैशांची मागणी केली. त्यापोटी त्यांनी अडीच लाख रुपये जबरदस्तीने देण्यास भाग पाडले. तसेच त्यांचा बिझनेस पार्टनर चंदन ठाकरे याने वेळोवेळी विश्वासघात व फसवणूक करुन आर्थिक नुकसान केले आहे.

या पाच जणांच्या जाचास कंटाळून राजेश साप्ते (वय ५१) यांनी ताथवडे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलिसांनी चंदन ठाकरे याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक लोहार अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Marathmola art director Raju Sapte's business partner arrested from Mumbai in suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.