दहावीला मी नापास झालो, पण कोणतीच परीक्षा शेवटची नसते!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 12:05 IST2022-06-18T11:58:55+5:302022-06-18T12:05:01+5:30
दहावीच्या परीक्षेत नागराज नापास झाले. पण त्यामुळे त्यांचे काही बिघडले नाही....

दहावीला मी नापास झालो, पण कोणतीच परीक्षा शेवटची नसते!
पुणे : अरे मित्रांनो, निराश कसलं होतायं. जरा माझ्याकडं बघा. सोलापूरमधील करमाळासारख्या गावात माझं बालपण गेले. तिथंच वाढलो, तिथंच जगलो. तेही अगदी मनसोक्त. पुढं माझं कसं होईल, मी काय करेन कशाचा काहीच पत्ता नव्हता. तुम्हाला कदाचित खोटं वाटेल मी दहावीत एकदा नव्हे, तर दोनदा नापास झालो. निकाल लागल्यानंतर मी चेहरा काहीसा पाडून येत असताना रस्त्यात वडील भेटले. त्यांनी ‘काय झालं?’ असं विचारलं, तेव्हा त्यांना मी दोन विषय राहिले सांगितले. वडील अडाणी होते. ते मला मुळीच रागावले नाहीत. उलट परत देता येईल ना, असे म्हणाले आणि मी दोनदा दहावीची परीक्षा दिल्यानंतर उत्तीर्ण झालो. माझ्यावर आई-वडिलांनी कधी ओझं लादलं नाही आणि मीही कधी ते घेतलं नाही. मी स्वत:ला सिद्ध करण्याचा कधी प्रयत्न केला नाही. कारण एखादी परीक्षा कुणाला नापास ठरवू शकत नाही.
आयुष्यात अनेक परीक्षा येतात आणि जातात. त्या देणं क्रमप्राप्त असतं. पण त्या परीक्षांमध्ये नापास झालो म्हणून मी उदास झालो असतो किंवा आत्महत्या केली असती तर आज इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. यशापयश ही येतंच असतात. आपल्या हातात असतं ते फक्त रस्त्यावर पुढं चालत राहाणं. काय माहिती आपल्याला त्या वाटेवर सरप्राईजदेखील मिळू शकतात. आपण ज्या गोष्टींचा कधी विचार केला नाही त्या आपोआप मिळून जातात. अशा छोट्या-छोट्या अपयशांमध्ये खचून न जाता जीवन आनंदीपणे जगण्यासारखं दुसरं सुख नाही. आयुष्यातला प्रत्येक क्षण मनसोक्तपणे जगता आलं पाहिजे. एकदा हे जगणं कळलं की सर्व मार्ग आपोआपच सुकर होत जातात. बघा तरी एकदा असं काहीसं टेन्शन फ्री जगून!
मी दहावीत दोनदा नापास झालो होतो. पहिल्या प्रयत्नात पास झालो असतो तर पुढच्या वर्गात गेलो असतो फार तर. मात्र नापास झालो म्हणून फार काही बिघडलं होतं असं मला वाटत नाही. दहावी, बारावी, एम. पी. एस. सी. , यू. पी. एस. सी. परीक्षा कुठलीही असो, ती अंतिम कधीच नसते. यशापयशात असल्या-नसल्यात आनंदानं जगत राहण्यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं यश नाही!
(शब्दांकन- नम्रता फडणीस)