पुणे: हैद्राबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या उपसमितीने घेतला आहे. या निर्णयाचा अभ्यास करायला आमच्याकडेही दोन महिने आहेत, असे सांगत राज्याच्या पशूसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे आपली नाराजी व्यक्त केली. या निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी मुंडे गुरूवारी सायंकाळी पुण्यात आल्या होत्या. पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे मंत्रीमंडळ उपसमितीने मराठा आरक्षण आंदोलन मिटवताना घेतलेल्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, आरक्षणाचा निर्णय अखेर मार्गी लागला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने जो निर्णय घेतला त्याचा मराठवाड्यातील मराठा समाजाला फायदा होईल. माझे इतकेच म्हणणे आहे की आर्थिक मागासलेपण हा वेगळा विषय आहे व सामाजिक मागासलेपण हा वेगळा. मंत्रीमंडळ उपसमितीने जो निर्णय घेतला, त्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, अशी अपेक्षा आहे. या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी दोन महिने आहेत. ओबीसींवर अन्याय होईल अशी भूमिका सरकार घेणार नाही असा विश्वास आहे.