Mumbai Pune Expressway: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाटात अनेक वाहने पडली बंद; गर्दीच्या वेळेत वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 09:26 IST2026-02-06T09:25:17+5:302026-02-06T09:26:23+5:30
Mumbai Pune Expressway Latest Traffic Update: वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा

Mumbai Pune Expressway: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाटात अनेक वाहने पडली बंद; गर्दीच्या वेळेत वाहतूक ठप्प
Mumbai Pune Expressway Traffic Updates: गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबईपुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूककोंडी हा प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे. उदासीन प्रशासनामुळे सर्वसामान्य प्रवाशांना हाल सोसावे लागल्याच्या घटना या मार्गावर गेल्या दोन दिवसांत खूपच जास्त घडताना दिसत आहे. सुरुवातीला गॅस टँकर पलटी झाल्याने वाहतूककोंडी झाली होती. तब्बल ३२ तासांच्या वाहतूककोंडीनंतर वाहतूक सुरळीत झाली होती. काल याच मार्गावर सिमेंट कंटनेर बंद पडल्याने वाहतूककोंडी झाली होती. त्यानंतर आज शुक्रवारी धीम्या गतीने वाहतूक सुरु असतानाच बोरघाटात अनेक वाहने बंद पडल्यामुळे पुन्हा एकदा मुंबईपुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याची स्थिती आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून दररोज लाखो प्रवासी आणि हजारो वाहने जातात. द्रुतगती मार्ग असल्याने प्रवाशांची अशी अपेक्षा असते की आपला प्रवास झटपट व्हावा. पण गेल्या दोन ते तीन दिवस या मार्गावर अशी स्थिती ओढवली आहे की, प्रवास तर दूरच कित्येक मंडळींची वाहने जागची हलली नव्हती. या मार्गावर गॅसचा टँकर पलटी झाला होता. त्यातून गॅस लीक होत होता. त्यामुळे तब्बल ३२ तास लोक या मार्गावर अडकून पडले होते. त्यानंतर कालच्या दिवसात एक सिमेंट कंटनेर नादुरुस्त झाल्याने रस्त्यात अडकून पडला होता. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास भोगावा लागला. त्यानंतर आजही सकाळी वाहतूक संथगतीने सुरु असताना लोणावळा जवळ अनेक वाहने बोरघाटात बंद पडली. त्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी झाली. सकाळी ५.३०-६.०० वाजता पुण्यातून निघालेली वाहने ८.३० वाजेपर्यंत लोणावळापर्यंतही पोहोचू शकली नव्हती. त्यामुळे आज पुन्हा या मार्गावरील नियोजनाचा अभाव उघड झाला.
अन्न-पाण्यापासून ते शौचालयापर्यंतच्या समस्या
दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकरच्या झालेल्या अपघातामुळे अभूतपूर्व वाहतूककोंडी झाली होती. त्यानंतर टँकरमधील वायू गळती रोखण्यात प्रशसनाला अपयश आल्याने तब्बल अडीच दिवस वाहतूक ठप्प झाली. यामध्ये अडकलेल्या प्रवाशांना अन्न-पाण्यापासून ते शौचालयापर्यंतच्या समस्यांना सामोरे जावे लागले. द्रुतगती मार्गावर आपत्कालीन यंत्रणाच सक्षम नसल्याची बाब आता अधोरेखित झाली आहे. ‘आयआरबी’च्या यंत्रणेने या समस्येसमोर हात टेकल्यानंतर महामार्ग पोलिसांनी ‘बीपीसीएल’ कंपनीकडे मदत मागितली असता, त्यांनी गॅस गळती रोखली. या अडीच दिवसांत कोंडीत अडकून पडलेल्या प्रवाशांच्या झालेल्या जाचातून प्रशासन बोध घेईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
