'ओठांवरची लिपस्टीकच जाते, तर कुणाला घामच येतो' पुणेकरांची मास्क न घालण्याची कारणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 14:27 IST2021-11-21T14:27:35+5:302021-11-21T14:27:51+5:30
पोलिसांच्या कारवाईच्या धास्तीमुळे ‘मास्क’ ला केवळ खिशात ठेवण्यापुरतेच महत्व उरले आहे

'ओठांवरची लिपस्टीकच जाते, तर कुणाला घामच येतो' पुणेकरांची मास्क न घालण्याची कारणे
पुणे : कोरोना रूग्णांची घटलेली संख्या आणि लसीचे दोन डोस झाल्यामुळे बिनधास्त झालेल्या पुणेकरांच्या चेह-यावरून ‘मास्क’ च हटला आहे. पोलिसांच्या कारवाईच्या धास्तीमुळे ‘मास्क’ ला केवळ खिशात ठेवण्यापुरतेच महत्व उरले आहे. ’मास्क’ कुठंय? असं विचारले तर कारणही तितकीच गंमतीशीर दिली जात आहेत.
काय तर म्हणे, मास्क घातल्यामुळे थुंकताच येत नाही..ओठांवरची लिपस्टीकच जाते. ड्रेसवर मँचिंग मास्कच मिळत नाहीत..तर कुणी म्हणतं मला तर मास्क घातल्याने मायग्रेनचा त्रासच होतो..तर कुणाला काय तर घाम येतो....ही कारणे पाहाता आणि कोरोनाची ओसरलेली दुसरी लाट पाहाता पोलिसांनीही मास्कची कारवाई काही प्रमाणात शिथिल केली आहे.
गतवर्षी कोरोनाचा झालेला उद्रेक पाहाता ‘मास्क’ हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा जणू अविभाज्य घटक बनला. अगदी दूध, भाजीपाला आणायला जातानाही मास्क घालणे लोकांंसाठी अनिवार्य बनले. इतकी कोरोनाची पुणेकरांनी धास्ती घेतल्याचे दिसून आले. बघता बघता ‘मास्क’ची बाजारपेठच उभी राहिली. साड्या, ड्रेस, वर मँचिंग मास्कला पसंती दिली जाऊ लागली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता दुचाकी आणि चारचाकीमध्ये मास्क न घालणा-यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा देखील उगारण्यास सुरूवात केली. मात्र, आज शहरात नेमके उलटे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर आणि मृत्यूचा आकडा घटल्याने पुणेकरांनी मास्कलाच रामराम ठोकला असल्याचे दिसत आहेत. गर्दीच्या ठिकाणीही पुणेकर मास्कविनाच फिरत आहेत.
मॉल, चित्रपटगृहे , हॉटेल्स आदी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य असे जरी लिहिले असले तरी मास्क खिशात किंवा पर्समध्येच दाखविण्यापुरते त्याचे महत्व उरले आहे. अगदी ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले देखील विनामास्कच बाहेर पडताना दिसत आहेत. पोलिसांनीही मास्कची कारवाई शिथिल केल्याने पुणेकरांचे अधिकच फावले आहे. कोरोना घटला ही सकारात्मक बाब असली तरी तो संपलेला नाही त्यामुळे पुणेकरांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे अन्यथा कोरोनाच्या तिस-या लाटेला निमंत्रण मिळू शकते.
’मास्क’’ची खरेदीही थंडावली
घराबाहेर पडताना ‘मास्क’ हवाच अशी मानसिकता बनलेल्या पुणेकरांनी मास्कलाच आयुष्यातून जवळपास हददपार केले आहे. पुणेकरांची ‘मास्क’ ची खरेदी थंडावली असून, बाजारातून मास्कही जवळपास गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आता ’मास्क’ची काय गरज?
''दीड वर्षे कसे तरी मास्क घातले. अगदी कुणाकडे सणासमारंभाला जातानाही ‘मास्क’ घालणे अनिवार्य बनले होते. पण आता लसीचे दोन डोस झाले आहेत. मग मास्कची गरजच काय? मास्क घातले की मेकअप बिघडतो आणि लिपस्टीकही निघून जाते असे तरुणी अमृता देशपांडे हिने सांगितले.''
मास्क जास्तवेळ घातला तर गुदमरायला होते
''मला दम्याचा त्रास असल्याने मास्क अधिक वेळ घालू शकत नाही. मास्क जास्तवेळ घातला तर गुदमरायला होते. त्यामुळे घराबाहेर पडताना क्वचितच मास्कच घालतो असे ज्येष्ठ नागरिक सुधीर म्हस्के यांनी संगीतले.''